| उरण | वार्ताहर |
करंजा बंदरातून अवैधरित्या कोळशाची वाहतूक करणाऱ्या ट्रकला भेंडखळ-कोस्टल रस्त्यावर अपघात झाल्याची घटना मंगळवारी (दि.28) सकाळच्या सुमारास घडली आहे. या अपघातात रस्त्यावरुन प्रवास करणारा मोटारसायकल स्वार थोडक्यात बचावला असून, ट्रकमधील ज्वलंतशील कोळसा रस्त्यावर विखुरलेल्या अवस्थेत पडला आहे.
उरण तालुक्यातील करंजा बंदरातून महसूल विभाग, प्रदुषण नियंत्रण मंडळ,आर टी ओ विभाग यांच्या देखरेखीखाली मोठ्या प्रमाणात अवैधरित्या ज्वलंतशील कोळशाची वाहतूक ही राजरोसपणे सुरु आहे. त्यामुळे शासनाचा महसूल मोठ्या प्रमाणात बुडत असून समुद्रातील खाडीकिनारी प्रदुषणात वाढ होत आहे. त्याचा परिणाम समुद्रातील मासे, मानवी जीवनावर होत आहे. तसेच, क्षमतेपेक्षा जास्त कोळशाची वाहतूक ही होत असल्याने रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. मंगळवारी सकाळच्या सुमारास करंजा बंदरातून अवैधरित्या कोळशाची वाहतूक करणाऱ्या ट्रकला भेंडखळ – कोस्टल रोडवर अपघात झाला आहे. या अपघातात रस्त्यावरुन जाणारा मोटारसायकल स्वार थोडक्यात बचावला आहे. महसूल विभाग, प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि आर टी ओ विभागाचे अधिकारी वर्गानी समुद्रातील मासे, मानवी जीवनावर परिणाम करणाऱ्या करंजा बंदरातील अवैधरित्या ज्वलंतशील कोळशाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.