| पोलादपूर | वार्ताहर |
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात पोलादपूरनजीक चोळई गावचे हद्दीत कंटेनर पलटी झाल्याची घटना सोमवारी (दि.27) रोजी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास घडली आहे. या अपघातात चालक जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कंटेनरवरील चालक इंद्रजीत जनकराज बिंद, (23) हा आपल्या सोबत क्लीनर सुदर्शन धर्मेंद्र बिरादर (19), रा. पवई, हे दोघे कंटेनरमध्ये कागद रोल घेऊन चिपळूण लोटे ते न्हावा सेवा नवी मुंबई येथे जात असताना चोळई गावच्या हद्दीत आला असता उतारावर चालक इंद्रजीत बिंद याचा कंटेनरवरील ताबा सुटल्याने कंटेनर डाव्या साईडला पलटी होऊन अपघात झाला. अपघातामध्ये चालक इंद्रजीत यास छातीला, हाता, पायाला दुखापत झाली आहे. सुदैवाने क्लीनर सुदर्शन बिरादार यास कोणतेही दुखापत झालेली नाही. या अपघाताची खबर समजताच कशेडी महामार्ग मदत केंद्राचे पोलीस व पोलादपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले. चालक इंद्रजीत यास पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. सदर अपघाताची नोंद पोलादपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.