सातत्यपूर्ण प्रयत्नातून यशप्राप्ती

तहसीलदार विक्रम पाटील यांचे प्रतिपादन

| खारेपाट | वार्ताहर |

आजच्या जगात प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा आहे. या स्पर्धेत आपल्याला कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे हे ठरवल्यानंतर त्या अंतिम ध्येयाला गवसणी घालण्यासाठी केलेल्या योग्य नियोजनाने आपण ध्येयापासून दूर जात नाही. यात सुरुवातीला अपयशही येईल; परंतु अपयशाने खचून न जाता कठोर परिश्रम, चिकाटी आणि सातत्यपूर्ण केलेल्या प्रयत्नातून यशप्राप्ती नक्की होते, असे प्रतिदापन तहसीलदार विक्रम पाटील यांनी केले आहे. अलिबाग तालुक्यातील तिनवीरा-खिडकी येथे ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. येथील व्ही.जी. पाटील एज्युकेशन फाऊंडेशन यांनी परिसरातील विद्यार्थ्यांसाठी गुणगौरव व करिअर मार्गदर्शन आणि विशेष गुणवंतांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. यावेळी तहसीलदार विक्रम पाटील यांनी विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या विविध संधी, स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी यासंदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी ठाणे महानगरपालिकेचे सेवानिवृत्त अधिकारी विनय पाटील, सेवानिवृत्त शिक्षक सुरेश पाटील, पवनेल येथील फुले महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ. पराग पाटील, मुख्याध्यापक राजेंद्र राजपुत, रिलायन्स अधिकारी भूषण पाटील, सदानंद पाटील मुख्याध्यापक महात्मा गांधी विद्यालय हाशिवरे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

विक्रम पाटील यांच्या हस्ते तालुक्यातील शाळा व महाविद्यालतील इयत्ता 10 वी व 12 वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि विषेश गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. इयत्ता दहावीमध्ये 96 टक्के गुण मिळवून हर्षित विजय पाटील हा पहिला आला, तर इयत्ता बारावी सायन्समध्ये मानस महेंद्र पाटील याने 86 टक्के गुण मिळविले आहेत. याचबरोबर प्रसन्न पाटील हे एस टी रायगड विभाग येथे कार्यरत असूनही कबड्डी, व्हॉलीबॉल खेळाचे राष्ट्रीय पंच म्हणून अनेक ठिकाणी काम करण्याची संधी त्यांना मिळाली आहे, तिथे त्यांना अनेक मानसन्मान मिळाले आहेत म्हणून त्यांचा तर लेभी गावचे रहिवासी व युसुफ मेहेरअली सेंटर ताराचे माध्यमिक शिक्षक विजय पाटील यांनी त्यांच्या शैक्षणिक कार्यकाळात अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत, त्याबद्दल त्यांचा तसेच रायगड भूषण अरूण सोनावणे हे शीघ्र कवी म्हणून प्रसिद्ध आहेत विविध व्यासपीठावरून ते अनेक मोठ्या व्यक्तींवर कविता रचून गाऊन दाखवतात म्हणून या सर्वांचा विशेष गुणवंत म्हणून सत्कार शाल, श्रीफळ, मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन तहसीलदार विक्रम पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्याचवेळी विलास पाटील माजी शिक्षक व शैलेश पाटील यांना पोलीस खात्यातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रसन्न कुमार जयराम पाटील, डॉ. पराग पाटील, भूषण पाटील आणि क्रांतीकुमार पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी परिसरातील विद्यार्थी पालक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभारप्रदर्शन विश्‍वस्त आल्हाद पाटील यांनी, तर सूत्रसंचालन माधुरी म्हात्रे यांनी केले.

Exit mobile version