| उरण | वार्ताहर |
जेएनपीटी वर्कर्स युनियनतर्फे कामगारांच्या विविध मागण्या संदर्भात प्रशासनाच्या विरोधात 07 जानेवारी 2022 रोजी लाक्षणिक उपोषण केले होते. त्या संदर्भात युनियनच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले होते. त्या गुन्ह्यांमधून उरण न्यायालयाने रविंद्र पाटील, सुरेश पाटील, बी.के.ठाकूर, प्रकाश नाचरे, जे.के.भोईर आणि मंगेश ठाकूर या सर्वांची निर्दोष मुक्तता केली आहे.
युनियनच्या वतीने प्रशासानासोबत वेळोवेळी बैठका घेऊन कामगारांच्या भवितव्यासंदर्भात प्रशासनाने लेखी करार करावा, मयत कामगारांच्या वारसांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घेण्यात यावे, तसेच निवृत्त कामगारांच्या वारसांना वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी हे आंदोलन करीत होतो, परंतु, प्रशासन दाद देत नव्हती त्याच्या निषेधार्थ लाक्षणिक उपोषण केले होते.याचाच मनात राग धरून प्रशासनाने कामगार नेत्यांवर गुन्हे दाखल केले होते.संघटनेच्या वतीने अॅड.रत्नदीप पाटील, अमर पाटील यांनी न्यायालयात कामगारांची बाजू मांडली. विशेष म्हणजे यासाठी त्यांनी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले नाही.