नायब तहसिलदारांचा इशारा
। पेण । प्रतिनिधी ।
पेण शहरात सर्रास हॉटेल व्यवसायिक, चायनिज सेंटर, वडापावच्या गाड्यांवर घरगुती सिलेंडर वापरले जात आहेत. त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा तहसिल कार्यालयाने दिला आहे. याबाबत वेळोवेळी तक्रार करूनही कारवाई झाली नाही. त्यातच दोन दिवसापूर्वी पेण शहरातील न्यू एकविरा चायनिज सेंटरमध्ये सिलेंडरने पेट घेतल्याने पुन्हा घरगुती गॅस सिलेंडरचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
महत्वाची बाब म्हणजे पेण शहरामध्ये 100 च्या आसपास हॉटेल, चायनिज सेंटर, व वडापावच्या गाड्या आहेत. परंतु, हॉटेल वगळता चायनिज सेंटर व वडापावच्या गाड्यांना अन्न व औषध प्रशासनाची परवानगी नाही. बिनधास्तपणे अवैधरित्या हे चायनिज सेंटर राजरोजपणे सुरू आहेत. यामध्ये पेण नगरपालिकेच्या शेजारील खाऊगल्ली, पामबिच मार्ग, धरमतर रोड, खोपोली रोड, यांचा समावेश आहे. या सर्वच ठिकाणी व्यवसायिक सिलेंडर न वापरता घरगुती वापरणारा सिलेंडर वापरला जात आहे.
पुरवठा अधिकारी तथा नायब तहसिलदार सुरेश थळे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, व्यवसायिक दुकानात घरगुती सिलेंडरचा वापर करणे कायद्याने गुन्हा आहे. अशा प्रकारे व्यवसायिक धंद्यासाठी घरगुती सिलेंडर वापरल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. कायदेशीर गुन्हे देखील नोंदविले जातील. येत्या दोन दिवसात पुर्ण शहरात याबाबत तपासणी करून ज्यांच्या, ज्यांच्याकडे घरगुती सिलेंडर असतील त्यांच्या, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे थळे यांनी स्पष्ट केले.
पेणसह रायगडमध्ये मोठया प्रमाणात चायनिज सेंटर सुरू आहेत. मधल्या काळात या चायनिज सेंटरविरोधात कायदेशीर कारवाई देखील केली आहे. मात्र, पुन्हा एकदा जे जे चायनिज सेंटर परवाना न घेता चायनिज सेंटर चालवत असतील तर त्यांच्या विरुध्द कायदेशीर कारवाई करून गुन्हेही नोंदविले जातील.
ल.द.दराडे ,सहाय्यक आयुक्त अन्न