आमदारांच्या निवासस्थानासमोर हायमॅक्सचा झगमगाट
। पेण । प्रतिनिधी ।
ऐन गणपती उत्सवापासून पेण-अंतोरा मार्गावर लाईट बंद आहे. मात्र भाजप आ. रवि पाटील यांच्या घरासमोर झगमागाट पहायला मिळत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. लाईट नसल्यामुळे या मार्गावरुन प्रवास करताना नागरिकांना अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे. यावरुन अंतोरावासिय संतप्त झाले असून, आमदारसाहेब, आमचा दोष काय, असा त्रासिक सवाल त्यांनी प्रसारमाध्यमांपुढे उपस्थित केला आहे.
पेण-अंतोरा मार्गावर आमदारांचे निवासस्थान आहे. निवासाच्या प्रवेशद्वारावर गरज नसतानाही भला मोठा हायमॅक्स उभारलेला आहे. त्या हायमॅक्समध्ये लाईट असते. त्यापुढे अंतोरा फाट्यापर्यंत म्हणजेच पेणच्या प्रवेशद्वारापर्यंत गेली कित्येक दिवस रस्त्यावरच्या लाईटचा पत्ताच नाही. तसेच पेण शहराच्या प्रवेशद्वारावर अंतोरा फाटयावर थिम पार्क आहे. त्यामध्ये सुध्दा पहाटेच्या वेळेवर लाईटचा पत्ता नाही. पहाटेच्या वेळी कित्येक नागरिक मॉर्निंग वॉकसाठी थिम पार्कमध्ये येतात. परंतु, गेली कित्येक दिवस पहाटेच्या सुमारास लाईट नसल्याने नागरिक थिम पार्कच्या प्रवेशद्वारातूनच परत जातात. महत्वाची बाब म्हणजे आमदार निवासापर्यंत लाईट आहे आणि त्यापुढे लाईट नाही. यावरून सर्वसामान्य नागरिकांनी काय समजावं, अशी विचारणाही होत आहे.
अंतोरा रोडवर लाईट नसल्याबाबत पेण नगरपालिकेचे विद्युत शाखेचे प्रमुख शिवाजी चव्हाण यांना विचारणा केली असता निशिगंधा हॉटेलच्या मागे ज्या विद्युत लाईन हॅगिंक केल्या आहेत. त्या लाईन परस्परांना स्पर्श होउन लाईट जात आहे. त्यावर ठोस उपाय योजना करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.