मटका,गावठी दारू विक्रेते; सराईत गुन्हेगारांवर कारवाई
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत पोलीस ठाणे हद्दीत अवैध मटका जुगार व गावठी दारूच्या अड्ड्यांवर पोलिसांनी मागील काही दिवसांत जोरदार कारवाई करत सराईत गुन्हेगारांवर चाप बसवला आहे. रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी आंचल दलाल यांची नुकतीच नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या नेतृत्वात ही कारवाई गतीने राबवली जात आहे. दलाल यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे उच्चाटन करण्याच्या दृष्टीने सूचक पावले उचलली असून, त्याचाच भाग म्हणून कर्जत पोलीस ठाण्यांतर्गत ठिकाणी सातत्याने धाडसत्र सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्जत पोलिसांनी 10 जून रोजी शहरातील धापया मंदिरासमोरील खाटीक आळी भागात, एका घराच्या पडवीत मटका जुगार सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत मंगेश देशमुख (40), रा. धापया मंदिरासमोर, कर्जत याला अटक केली. या कारवाईत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, सदर गुन्ह्यास 7 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे. गुन्हा ‘साक्ष’ ॲपवरही नोंदवण्यात आला आहे. देशमुख याच्यावर याआधीही मटका जुगारप्रकरणी गुन्हे दाखल असून, तो एक सराईत गुन्हेगार मानला जातो. तर, सात जून रोजी कर्जत शहरातील पाटील आळी येथे पोलिसांनी छापा टाकून संदीप गुरव (47) याला कल्याण मटका जुगाराचे आकडे घेऊन जुगार चालवत असताना पकडले. त्याच्याकडून दोन ते तीन हजारांची रोकड हस्तगत करण्यात आली. त्याच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे.
9 जून 2025 रोजी जांभिवली येथे गजानन मंगलमुने (55), फुलारेवाडी याच्या घरात पोलिसांनी छापा टाकून पाच लीटर गावठी हातभट्टीची दारू जप्त केली. त्याच्यावर विनापरवाना दारू विक्रीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच दिवशी सायंकाळी 7 वाजता, चिंतामण जाणू आभाळे (रा. जांभिवली, पो. गौरकामत) याच्या घरी दहा लीटर कॅनमधून 9 लीटर गावठी दारू मिळून आली. या दारूची अंदाजे किंमत 900 रुपये असून, त्याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 11 जून रोजी आवळस (ता. कर्जत) येथे छाप्यात सुरेश सीताराम नीलम (52) याच्या घरी पाच लीटर गावठी दारू सापडली. याची किंमत सुमारे पाचशे रुपये इतकी असून, त्याच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. या सर्व कारवाया पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या आदेशाने व पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जयवंत वारा, पोलीस हवालदार समीर भोईर, पोलीस नाईक केशव नागरगोजे यांच्या पथकाने छापे टाकून हि कारवाई केली. दरम्यान, कर्जत पोलिसांनी कर्जत शहरामध्ये मटका, गावठी दारू, गुटखा या अवैध धंद्यांमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत असून, पोलिसांनी उचललेल्या या कडक पावलांचे नागरिकांकडून स्वागत होत आहे. दरम्यान, कर्जत पोलिसांची ही मोहीम पुढेही अशीच सुरू राहणार असल्याचे स्थानिक पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
