| नवी मुंबई । प्रतिनिधी ।
नवी मुंबई शहरातील दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे वाहन चालवताना वाहतुकीचे नियम डावलून असुरक्षित पणे रस्त्यावर वाहने चालवली जातात. त्यामुळे कित्येकदा अपघाताला निमंत्रण दिले जाते. हा अपघात काहींच्या जीवावर ही बेतो तर काही जखमी होत असतात. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. हे अपघात कमी करण्यासाठी वाशी आरटीओ विभागाकडून रस्ता सुरक्षा अंतर्गत वाहतूक नियम न पाळणार्या वाहनांवर एप्रिल पासून ते ऑक्टोबर 2022 पर्यंत एकूण 5 हजारांहून अधिक वाहनांवर कारवाई केलेली आहे.
रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत रस्ता सुरक्षित प्रवास वाहतुकीचे धडे दिले जातात. हेल्मेट वापरणे, सिटबेल्ट न वापरणारे, मोबाईलवर बोलत वाहन न चालविणे, डोन्ट ड्रंक अँड ड्राईव्ह याविषयी जनजागृती केली जाते. त्यांना सुरक्षित वाहतुकीचे नियम समजावून सांगितले जाते. तरी देखील वाहन चालक वाहतूक नियमांना पायदळी उडवून बेदारकपणे वाहने चालवत असतात. कित्येकदा दुचाकीस्वार लांब पल्याच्या किंवा लहान पल्याच्या रस्ता गाठण्यासाठी देखील हेल्मेट न वापरण्याला पसंती देत असतात. परिणामी अनावधानाने अपघाताला निमंत्रण मिळते आणि हेल्मेट नसल्यामुळे त्यांच्या जीवावर बेतते. त्याचबरोबर चारचाकी वाहन चालक देखील सीटबेल्ट न वापरता बेशिस्तपणे वाहन चालवतात . शिवाय वाहन चालवताना मोबाईलवर देखील बोलत असतात. त्यामुळे यादरम्यान नजर हटी दुर्घटना घटी अशा घटना घडत असतात. त्यामुळे हे अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वाशी आरटीओ विभागाने बेशिस्त वाहन चालकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.