| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत शहर बचाव समितीची ट्रॅफिक समस्येबाबतची बैठक गुरुवारी (दि.10) उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड यांच्या दालनात घेण्यात आली. या बैठकीस कर्जत शहर बचाव समितीचे कैलास मोरे, भाऊ खानविलकर, कृष्णा जाधव, विकास चित्ते, धर्मेंद्र मोरे, भीमराव गाडे, स्वीटी बार्शी, विजय बेडेकर, सतीश मुसळे, केशव मोरे, अतुल पवार, प्रशांत उगले उपस्थित होते.
चार फाटा येथील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्यात वाहतूक कोंडीच्या ठिकाणांवर लक्ष ठेवून आवश्यक त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देण्याचे नियोजन, चार फाटा हा वाहतूक कोंडीचा प्रमुख केंद्रबिंदू असल्याने छोट्या बायपास मार्गांवर कर्मचारी नियुक्तकरून वाहतूक नियंत्रणात ठेवण्याचे नियोजन, मुख्य बाजारपेठेतील दररोजची वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजनांवर चर्चा, गर्दीच्या वेळेत मुख्य बाजारपेठेत येणाऱ्या मोठ्या वाहनांना बाजारपेठेबाहेर थांबविण्याबाबत उपाययोजना करण्याची सूचना देण्यात आल्या. तसेच मा. जिल्हाधिकाऱ्यांच्या (दि.12) मार्च 2026 रोजीच्या अवजड वाहनांसाठी लागू असलेली बंदीची वेळ तातडीने अंमलात आणून कारवाई सुरू करण्याची मागणी, शाळांच्या परिसरातील वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्याची मागणी, शाळा व शहर परिसरात बेशिस्तपणे बाईक चालविणाऱ्या तरुणांवर कारवाई करण्याची मागणी, दहिवली परिसर, आयोध्या परिसर, लहान पुलाजवळील गार्डन तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग वाढविण्याची मागणी करण्यात आली. अडीच तास चाललेल्या बैठकीत वाहतूक व्यवस्थेबाबत अनेक महत्त्वपूर्ण व निर्णायक मुद्द्यांवर चर्चा झाली. बैठकीच्या शेवटी कर्जत शहर बचाव समितीचे समन्वयक ॲड. कैलास मोरे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी गायकवाड यांचे आभार मानले.






