। उरण । वार्ताहर ।
न्हावा शेवा वाहतूक शाखेच्यावतीने रहदारीच्या नियमांचे उल्लंघन करणार्या बेशिस्त वाहन चालकांना 2024 माहे जानेवारी ते डिसेंबर अखेरपर्यंत मोटर वाहन कायद्याखाली एकूण 31,600 वाहन चालकाविरुद्ध विविध कलमाखाली दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्या संबंधित वाहन चालकांकडून एकूण 2,88,33,000 इतक्या रकमेचा दंड आकारण्यात आला असून, सदर दंडा पैकी एकूण 44,66,700 इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आल्याची माहिती न्हावा शेवा वाहतूक शाखेकडून देण्यात आली आहे.
सदर कारवाई अंतर्गत रस्त्यावर चुकीच्या ठिकाणी वाहने पार्क करून रहदारीस अडथळा निर्माण करणार्या 14,450 वाहन चालका विरुद्ध, विदाऊट हेल्मेट दुचाकी वाहन चालवणार्या 9,585 चालकाविरुद्ध, चार चाकी वाहन चालविताना सीट बेल्ट न वापरलेल्या 3125 वाहन चालकाविरुद्ध, तसेच लाल सिग्नल तोडणार्या 950 वाहन चालकाविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
न्हावा शेवा वाहतूक शाखेच्यावतीने संपूर्ण उलवे व जेएनपीटी परिसरात विशेष नाकाबंदी व तपासणी मोहीम आखण्यात आली, असून कोणत्याही वाहनचालकाने मद्यप्राशन करून वाहन चालू नये व मद्य प्राशन करून वाहन चालविताना आढळून आल्यास संबंधितां विरुद्ध कठोर दंडात्मक कारवाई सोबतच त्यांचे वाहन जप्ती अथवा वाहन परवाना निलंबन कारवाई करण्यात येईल असा इशारा देऊन, जेएनपीटी व उलवे परिसरातील वाहन चालकांनी महामार्ग तसेच अंतर्गत रस्त्यावर वाहने चालवताना स्वतःचे व इतरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मोटर वाहन कायद्याचे पालन करावे असे आवाहन न्हावा शेवा वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जी.एम. मुजावर यांनी केले आहे.