पोलिसाला फरफटत नेल्याप्रकरणी कारवाई

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

वपोनी तानाजी नारनवर यांची बदली

| कळंबोली | प्रतिनिधी |

कळंबोली परिसरात नाकाबंदीदरम्यान एका भरधाव मोटारीने पोलीस कर्मचाऱ्याला बोनेटवरून सुमारे 200 मीटर फरफटत नेल्याच्या खळबळजनक घटना घडली होती. या घटनेची नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास झालेला विलंब आणि घटनेची माहिती वरिष्ठांना न दिल्याचा ठपका ठेवत, कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कळंबोली परिसरात पोलिसांनी नाकाबंदी लावली होती. यावेळी तपासणीसाठी थांबवण्याचा इशारा केल्यानंतरही एका भरधाव मोटारचालकाने वाहन न थांबवता कर्तव्यावर असलेल्या पोलीस शिपाई दिलीप भोई यांना धडक दिली. या धडकेनंतर ते मोटारीच्या बोनेटवर पडले असता, चालकाने गाडी न थांबवता त्यांना तब्बल 200 मीटरपर्यंत फरफटत नेले. या घटनेत पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही गंभीर घटना घडूनही संबंधित पोलीस ठाण्याकडून तातडीने गुन्हा नोंदवण्यात आला नाही. तसेच, या प्रकाराची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनाही देण्यात आली नव्हती. माध्यमांमधून या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर हा प्रकार वरिष्ठांच्या निदर्शनास आला. त्यामुळे कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांच्यावर कारवाई करत त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, या प्रकरणातील फरार संशयित चालकाला शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. 22 वर्षीय संशयित चालक हा एका कंपनीत कामाला असून, मित्रासोबत मुंबईतील मरीन ड्राइव्ह येथे फिरण्यासाठी आला होता. परतीच्या प्रवासात रस्ता चुकल्याने त्याची गाडी रोडपालीमार्गे कळंबोलीत आली आणि नाकाबंदीत हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी त्याला जळगाव येथून ताब्यात घेतले असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

Exit mobile version