अभिनेते जॉनी लिव्हर यांचे कलाकारांना प्रेरणादायी मार्गदर्शन
सरकारनेदेखील कलाकारांच्या कठीण प्रसंगात पाठीशी उभे राहावे
पनवेल | वार्ताहर |
कोरोनाकाळात मागील एक-दीड वर्ष संपूर्ण कलाक्षेत्र ठप्प असल्याने कलाकारांवर काम नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. सध्या कलाकार कठीण परिस्थितीतून जात असून, हीदेखील वेळ सरेल.. सरकारनेदेखील अशा वेळी कलाकारांच्या पाठीशी उभे राहावे, अशी भावना अभिनेते जॉनी लिव्हर यांनी व्यक्त केली.
कोरोनाच्या संकटात मनाने खचलेल्या कलाकारांचे मनोबल वाढवण्यासाठी सुप्रसिद्ध विनोदी अभिनेते जॉनी लिव्हर यांनी मराठी-हिंदी वाद्यवृंद क्षेत्रातील कलाकारांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. निवेदक-मिमिक्री आर्टिस्ट डी महेश यांच्या संकल्पनेतून नेरुळ येथील ज्येष्ठ नागरिक हॉल येथे रविवारी (दि. 15 ऑगस्ट) संध्याकाळी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ङ्गहसा व आनंदी राहाफ या कार्यक्रमाच्या माध्यमातून कलाकारांशी संवाद साधला.
स्वातंत्र्यदिनाच्या संध्येला देशभक्तीपर गीतांनी या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. रायगड, नवी मुंबई, मुंबई, ठाणे येथील गायक, वादक, निवेदक आदींनी कार्यक्रमात सादरीकरण करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. मिमिक्री आर्टिस्ट असोसिएशन मुंबई, मराठी व्यावसायिक वाद्यवृंद निर्माता संघ, लावणी कलावंत महासंघ, संगीत एकता सांस्कृतिक कला व सामाजिक संस्था, संतोष फाऊंडेशन या सर्व कलसंस्थाच्या वतीने वाद्यवृंद क्षेत्रातील कलाकारांसाठी विनोदी अभिनेते जॉनी लिव्हर यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. निर्माता उदय साटम, बाळा पांचाळ, शंकर पिसाळ, मुकेश उपाध्ये, संतोष लिंबोरे, हरेश शिवलकर, जयेश चाळके आदींनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विशेष मेहनत घेतली. परेश दाभोळकर व प्रवीण मोहकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
कोरोनाच्या कठीण परिस्थितीत जे कलाकारांच्या पाठीशी उभे राहिले त्यांचे आभार मानतो व ही वेळदेखील सरून जाईल व पुन्हा एकदा कलाकार रंगमंचावर डौलाने काम करेल.
जॉनी लिव्हर, अभिनेता