दिव्यांगांना ये-जा करण्यासाठी मॅट टाका

। पाली/बेणसे । वार्ताहर ।
शासनाच्या विविध योजना व उपक्रमासंदर्भात पेण नगरपरिषदेत विविध भागांतील दिव्यांग मोठ्या प्रमाणात येत जात असतात. मात्र दिव्यांगांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारची सुविधा साधने याठिकाणी दिसत नाहीत.सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, येथील गुळगुळीत लादिवरून घसरून अपघात होण्याची भीती वाढली आहे. त्यामुळे पेण नगरपरिषदेत दिव्यांगांना ये जा करण्यासाठी मॅट टाका, अशा महत्वपूर्ण मागणीचे निवेदन मातृत्व अपंग सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन गायकवाड यांनी पेण नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्‍यांना निवेदन दिले. सदर निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी रायगड, प्रांताधिकारी पेण, पेण तहसीलदार, पोलीस निरीक्षक पेण यांना देण्यात आले आहे. यावेळी एकनाथ म्हात्रे, बाबुराव मोकल, देवेंद्र कोळी, सिद्धेश तांबेकर, प्रशांत कदम व अन्य दिव्यांग कार्यकर्ते उपस्थित होते.
सदर निवेदनात नमूद केले आहे की, पेण नगरपरिषदेमध्ये दिव्यांगांना येण्याजाण्यासाठी फुट स्ट्रेप्स कुठेही नाहीत, सर्वत्र गुळगुळीत लादी आहे, जी दिव्यांगांसाठी अत्यंत धोकादायक आहे,त्यामुळे दिव्यांग कोसळून जखमी होणे अथवा जीवित हानी होण्याची शक्यता आहे. भविष्यात दिव्यांगाचा कोणताही अपघात झाल्यास प्रशासन जबाबदार राहील, शिवाय लवकरात लवकर इथे मॅट न टाकल्यास मुख्याधिकारी यांच्या कार्यालयाबाहेर बेमुदत आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा सचिन गायकवाड यांनी दिला आहे.

Exit mobile version