बागेत गाय, वासरू, फ्लेमिंगोचे पुतळे
। उरण । प्रतिनिधी ।
सामाजिक क्षेत्रात आपल्या चौफेर गुणांनी अनेक समाजपयोगी कार्य करणारे केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक राजू मुंबईकर यांचे सामाजिक क्षेत्रातील योगदानाबरोबरच शैक्षणिक क्षेत्रातील कार्य देखील प्रशंसनीय आहे. त्यांनी वाडी-वस्तीवरील आदिवासी मुलांच्या शिक्षणाकरिता लागणारे शैक्षणिक साहित्य व कपडे वाटप केले आहेत. तसेच, त्यांनी दत्तक घेतलेल्या 46 आदिवासी मुलांच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च अशी अनेक प्रकारची कार्य केली आहेत. अशातच पुन्हा एकदा राजू मुंबईकर यांच्या प्रयत्नातून पनवेलमधील महात्मा फुले महाविद्यालयात खास मुलींकरिता बनविण्यात आलेल्या बागेत गाय, वासरू या प्राण्यांचे आणि फ्लेमिंगो या पक्षाचे पुतळे बसविण्यात आले आहेत.
निसर्गाच्या कुशीत वसलेले रयत शिक्षण संस्थेचे पनवेलमधील महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात राजू मुंबईकर यांच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम साकारले गेले. यामध्ये वृक्षारोपण, सापांबद्दल असणारे समज आणि गैरसमज या विषयांवर विद्यार्थ्यांकरिता प्रबोधनात्मक व्याख्यान अश्या कार्यक्रमांच्या माध्यमातून या महाविद्यालयासोबत त्यांचे नाते जोडले गेले आहे. अनेक यशस्वी, कर्तृत्ववान विद्यार्थ्यांना घडविणार्या महात्मा फुले महाविद्यालयाच्या बागेत प्राणी व पक्षांचे पुतळे बसवून या निसर्गरम्य कॉलेजच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे. यामुळे महात्मा फुले महाविद्यालयाचे रूप आणखीनच उठून दिसेल एवढं मात्र नक्की. राजू मुंबईकर यांच्या औदार्यातून साकारलेल्या या कार्यक्रमाकरिता प्राचार्य गणेश ठाकूर, राजू मुंबईकर, पुष्पलता मढवी, जयश्री ठाकूर, आशा मेणकर, डॉ.अंजलीजी टकले, संगिता ठाकूर, डॉ. प्रफुल्ल वशेणीकर आणि सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी वर्ग उपस्थितीत होता.