अलिबागचा कचराप्रश्‍न मार्गी लावा; आ. जयंत पाटील आक्रमक

| मुंबई | प्रतिनिधी |
अलिबाग शहरातील घनकचर्‍याचा प्रश्‍न जागेअभावी दिवसेंदिवस गहन होत चालला आहे. वारंवार याप्रश्‍नी सभागृहात आवाज उठविला आहे. आजूबाजूच्या ग्रामपंचायती त्यांच्या हद्दीत घनकचरा टाकून देत नाहीत. त्याऐवजी वनविभागाच्या जागेत घनकचरा टाकायला परवानगी द्या, जंगलात कचरा पडला तर त्याचे खतात रूपांतर होते, याचा प्रशासनाने विचार करावा, अशी मागणी आ. जयंत पाटील यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत केली. यावर पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी हा प्रश्‍न मार्गी लावू, असे आश्‍वासन दिले.

आ. जयंत पाटील म्हणाले की, अलिबाग नगरपरिषद हद्दीतील गोविंद नगर घनकचरा डेपोला उन्हामुळे आग लागली असेल असे मला वाटते. यात अधिकार्‍यांचा दोष नाही. घनकचरा डेपोच्या जागेसाठी मी बरेच वर्षे प्रयत्न करीत आहे. मात्र, अलिबाग शहराजवळ जागेचा गुंठ्याचा भाव एक कोटी इतका सुरु आहे. आजूबाजूच्या ग्रामपंचायती त्यांच्या हद्दीत घनकचरा टाकून देत नाहीत. त्याऐवजी फॉरेस्टच्या जागेत घनकचरा टाकायला परवानगी द्या. जंगलात कचरा पडला तर त्याचे खतात रूपांतर होते. याचा प्रशासनाने विचार करावा.

उद्योगमंत्री उदय सामंत उत्तर देताना म्हणाले की, रत्नागिरीमध्ये माझ्या मतदारसंघात घनकचराबाबत प्रकल्प राबविल्यामुळे तिथे घनकचर्‍याची समस्या दूर झाली आहे. त्याच धर्तीवर अलिबाग शहरात ती योजना राबविण्याबाबत विचार करण्यात येईल आणि अर्थसंकल्पिय अधिवेशन संपल्यानंतर रायगड जिल्ह्याच्या पहिल्या दौर्‍यात घनकचरा समस्येबाबत बैठक घेण्यात येईल, असे आश्‍वासन त्यांनी विधान परिषद सभागृहात दिले.

प्रशांत नाईक यांचे विधानपरिषदेत कौतुक
अलिबाग शहरातील गोविंद बंदर डम्पिंग ग्राऊंडवरील कचर्‍याला लागलेली आग अलिबाग नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रसंगावधान राखून नियंत्रणात आणली. याबाबतची लक्षवेधी आ. अनिकेत तटकरे यांनी मांडली. दरम्यान, याबाबत रायगडचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रशांत नाईक आणि सहकार्‍यांच्या कामाचे कौतुक केले आहे.

Exit mobile version