| मुंबई | प्रतिनिधी ।
दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची व्यवस्थापक दिशा सालियन हिच्या मृत्यूप्रकरणात एफआयआरमध्ये आदित्य ठाकरेंचे नाव असल्याचा दावा सतिश सालियन यांनी केला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चा सुरू झाली असून, आदित्य ठाकरेंना लक्ष्य केले जात आहे. याप्रकरणात आदित्य ठाकरे यांनी यापूर्वीही फारशी वाच्यता केलेली नाही. मात्र, आता त्यांनी यावर मौन सोडले आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत मोठा खुलासा केला आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले की, मी दिशा सालियान यांना कधीही भेटलेलो नाही किंवा त्यांच्याशी माझी ओळखही नव्हती. राजकीय हेतूने, वैयक्तिक द्वेषापायी, चारित्र्यहनन करण्याच्या हेतूने काही लोकांकडून गेल्या 6 वर्षांपासून वारंवार या दुर्दैवी घटनेशी कुठलाही पुरावा वा संबंध नसतानाही माझे नाव जोडण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न सुरू आहे. कुठलंही तथ्य आणि सत्य नसलेले हे सततचे खोटे कँपेन दुर्दैवी आहे. बोंबाबोंब करून केल्या जाणाऱ्या टिव्ही चॅनल्सवरच्या खोट्या चर्चा आणि मिडिया ट्रायल्स सत्य बदलू शकत नाहीत. अधिकृत यंत्रणांना कुठल्याही व्यत्ययाशिवाय, राजकीय हस्तक्षेपाशिवाय, चारित्र्यहननाशिवाय आणि निःपक्षपातीपणे पुन्हा एकदा नव्याने ही चौकशी करू द्या. परत एकदा सांगतो, ज्यांना वाटत असेल की अशा चारित्र्यहननाच्या आणि खोट्या प्रचाराच्या मार्गाने तुम्ही आम्हाला शांत बसवू शकाल तर तो तुमचा भ्रम आहे. सत्यासाठी, अन्यायाविरुद्ध, देशवासीयांना सोबत घेऊन आमचा लढा सुरुच राहील, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
आदित्य ठाकरेंनी मौन सोडले
