साडेतीन तास पोलीस ठाण्याबाहेर ठेवले ताटकळत
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील माथेरानचे डोंगरात असलेल्या 12 आदिवासीवाड्यांमध्ये रस्ता व्हावा या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. त्या आंदोलनाची दखल घेऊन पोलीस प्रशासनाने सोमवारी त्या सर्व आदिवासी लोकांसोबत चर्चा करण्याचे आश्वासन ग्रामीण विकास यंत्रणा यांनी दिले होते. मात्र, तब्बल साडेतीन तास ताटकळत ठेवत ग्रामीण विकास यंत्रणेचे महत्त्वाचे अधिकारी यांनी भेट देण्याचे टाळले आणि आपल्या विभागातील शाखा अभियंता यांना पाठवून देत आदिवासी समाजाची बोळवण करण्याचा प्रयत्न केला.
(दि.9) मार्च रोजी माथेरान डोंगरातील 12 आदिवासी वाड्यांच्या आदिवासी ग्रामस्थांनी नेरळ माथेरान रस्त्यावर रास्ता रोको केला होता. या 12 वाड्या जोडणारा रस्ता भूमिपूजन होऊनदेखील प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जात नसल्याने आदिवासी बांधवांनी रास्ता रोको केला. त्यावेळी नेरळ माथेरान घाट रस्ता जाम झाल्याने शेवटी पोलिसांनी मध्यस्थी करीत संबंधित रस्त्याचे शासकीय विभाग कार्यकारी अभियंता यांना नेरळ येथे पोलीस ठाणे येथे बैठकीसाठी बोलावले जाईल असे आश्वासन दिले होते. त्यानुसार सकाळी 11वाजता 12 आदिवासी वाड्यांचे लोक नेरळ पोलीस ठाणे येथे जमू लागले.नेरळ पोलीस ठाण्याच्या बाहेर किमान 300आदिवासी लोकांची गर्दी जमली होती आणि सर्व लोक महाराष्ट्र ग्रामीण विकास यंत्रणा यांचे अलिबाग येथील कार्यकारी अभियंता सारिका देसाई यांची वाट पाहात होते. दुपारी तीन वाजले तरी कार्यकारी अभियंता नेरळ येथे पोहचल्या नसल्याने आदिवासी ग्रामस्थ संतप्त झाले.
आदिवासी लोक संतप्त झाल्याची माहिती ग्रामीण विकास यंत्रणेच्या कार्यकारी अभियंता देसाई या कर्जत येथे येऊन देखील आदिवासी लोकांची समजूत काढण्यासाठी नेरळ येते आल्या नाहीत. मात्र पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांनी कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होत असल्याने तुम्ही कर्जत येथे येऊन नेरळ येथे येत नसल्याची नोंद रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे करणार असल्याची सूचना केली. त्यावेळी आदिवासी कार्यकर्ते आणि रास्ता रोकोचे प्रमुख आंदोलक जैतू पारधी आणि गणेश पारधी यांनी आक्रमक भूमिका घेतली.त्यावेळी य भागातील कार्यकर्ते पालू निरगुडे, सुनील पारधी, दता निरगुडे, गोविंद साबरी, पांडुरंग साबरी, सोमा निरगुडे, परशुराम दरवडा, ग्रामपंचायत सदस्य जयेंद्र कराळे, विलास देशमुख, तसेच सुरेश निरगुडे, बुधाजी निरगुडे, कुमार बासरे आदींनी आदिवासी लोकांना शांत केले.
