शिवसेना ठाकरे गटाचे महावितरण कंपनीला निवेदन
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यात वीजग्राहकांची कोणतीही परवानगी न घेता स्मार्ट मीटर बसवले जात आहेत. वीज ग्राहकांच्या असंख्य तक्रारी शिवसेना ठाकरे पक्षाकडे आल्या होत्या. महावितरण कंपनीकडून ग्राहकांच्या कोणत्याही प्रकारच्या परवानग्या न घेता स्मार्ट मीटर बसवले जात आहेत. त्यामुळे महावितरण कंपनीच्या या स्मार्ट मीटरविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला आहे. दरम्यान स्मार्ट मीटर बसवण्यास स्थगिती दिली नाही तर शिवसेना रस्त्यावर उतरेल आणि प्रसंगी खळखटाक आंदोलन छेडेल, असा इशारा महावितरण कंपनीला दिला आहे.
बाजीराव दळवी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे शिष्टमंडळ महावितरणचे उप अभियंता चंद्रकांत केंद्रे यांना भेटले. यावेळी सुनिता मोरे, रामदास घरत, लहु श्रीखंडे, सुरेश बोराडे, बंडू क्षीरसागर, संदीप रुठे, अजय कराळे, पंढरीनाथ मोडक, महेश लोट, महेश मोंधले, तसेच अन्य पदाधिकारी होते. स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती तात्काळ थांबविण्यात यावी. ग्राहकांच्या संमतीशिवाय कोणत्याही घरात किंवा आस्थापनात स्मार्ट मीटर बसवू नयेत. स्मार्ट मीटरच्या फायद्या-तोट्यांबाबत जनजागृती व खुली चर्चा आयोजित करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.
कर्जत तालुक्यात स्मार्ट मीटर जबरदस्तीने ग्राहकांवर लादू नयेत व स्मार्ट मीटर धोरणाचा पुनर्विचार करावा, याबाबत शिवसेना ठाकरे गटाकडून निवेदन देण्यात आले आहे. स्मार्ट मीटरमुळे वीज दरवाढ, प्रीपेड प्रणालीची सक्ती, तांत्रिक अडचणी तसेच सर्वसामान्य ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडण्याची भीती नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे स्मार्ट मीटर बसविण्याबाबत ग्राहकांची संमती घेणे आवश्यक आहे. कोणत्याही ग्राहकावर त्याच्या इच्छेविरुद्ध स्मार्ट मीटर बसविण्याची जबरदस्ती करू नये. विद्यमान मीटर बदलण्यास इच्छुक नसलेल्या ग्राहकांना पूर्वीचे मीटर वापरण्याची मुभा द्यावी. वरील मागण्यांचा सकारात्मक विचार करून योग्य ती कार्यवाही करावी, जर आमच्या मागण्यांचा विचार केला नाही तर शिवसेना पद्धतीने आंदोलन करण्यात येईल, असाही इशारा महावितरण कंपनीला देण्यात आला.







