| नेरळ | वार्ताहर |
सर्वत्र नवरात्र उत्सवाची धूम सुरू असून प्रामुख्याने आदिवासी भागात आदिवासी समाजातील लहान मुली आणि महिला या भोंडला सण साजरा करण्यात मग्न असल्याची दिसून येत आहे. या आदिवासी मुली आपला भोंडला हा घराच्या बाहेर, गावातील मंदिरा बाहेर, अंगणात तरी कधी रस्त्यावर वाहनांच्या समोर साजरा करून मनोरंजन करीत आहेत. महाराष्ट्रात पूर्वी भोंडला नृत्य सर्वत्र असायचे. सध्या भोंडला लुप्त पावत असून त्याची जागा गरबानृत्य घेत आहे. मात्र आदिवासी समाजाने भोंडला हा पारंपरिक सण साजरा करून आपली लोक परंपरा टिकवून ठेवण्याचे काम करीत आहे. त्यांचा भोंडला रस्त्यावर साजरा होतो,त्या मुली रस्त्यावर येणारी गाडी अडवून वेगवेगळ्या गाण्यांवर भोंडला सादर करतात. तर गावातील मंदिराबाहेर आणि एखाद्या व्यक्तीच्या अंगणात देखील या मुली भोंडला सादर करून नवरात्र उत्सवाच्या काळात आणि दिवाळी सणाच्या काळात भोंडला साजरा करून मनोरंजन मिळवतात.
आदिवासी समाजाने गावातील प्रत्येकाच्या घरी जाऊन आपल्या सोबत असलेल्या सुपात नारळ खण आणि फुलांच्या रूपाने दैवी भोवती फेर धरून तिची आराधना करण्याची प्रथा आजही सुरू आहे. नवरात्री काळात लहान मुली सुद्धा पितळेच्या तांब्याला फुलांचा हार गुंफून त्यात देवीची स्थापना केली जाते. या मुली आपल्या फुलांनी सजवलेल्या गडू हे गावातील प्रतिष्ठित लोकांच्या घरी नेऊन ते काही बोलायचे आत भोंडला सुरू करतात.तर या नटून थटून निघालेल्या मुली आपल्या गावात येणारी गाडी अडवून त्यांच्या पुढे भोंडला करतात आणि मनोरंजन करतात.तर शहरात मोठे सेलिब्रिटी आणून हजारोंच्या उपस्थित होणारा गरबा नक्कीच नेत्रदीपक असेल.परंतु ग्रामीण भागातील आदिवासी स्त्रिया मुलींचा भोंडला सुद्धा तितकाच आनंद देऊन जात असून ही परंपरा देखील टिकवून राहण्यास मदत होत आहे.