दहशत! तालिबान्यांचा नवा फतवा

। काबूल । वृत्तसंस्था ।
अफगाण नागरिक देश सोडणार नाहीत. यापुढे अफगाण नागरिकांना आता देशाबाहेर जाता येणार नाही. बचावकार्यासाठी वापरण्यात येणारी विमाने जिथे उतरत आहेत, त्या काबूल विमानतळावर आता अफगाण नागरिकांना जाऊ दिलं जाणार नाही.असा इशारा तालिबान्यांनी दिला आहे.

तालिबान्यांतर्फे पत्रकार परिषदेत बोलताना तालिबानचा प्रवक्ता झबिउल्लाह मुजाहिदने सांगितलं की, अफगाणिस्तानातली परिस्थिती सध्या जगभरासाठी चिंतेचा विषय ठरली आहे. तालिबान्यांनी देश ताब्यात घेतल्यानंतर आता अफगाणिस्तानचं भविष्य काय? असा प्रश्‍न जगापुढे आहे. अशातच तालिबानी दररोज वेगवेगळे आदेश देत आहेत, फतवे काढत आहेत. त्यावरुन या प्रश्‍नाची गंभीरता अधोरेखित होत आहे. आताही तालिबान्यांनी एक नवी घोषणा दिली आहे.

याबद्दल सीएनएनने दिलेल्या बातमीमध्ये सांगितलं आहे की, या विमानतळाकडे जाणारा रस्ता अफगाण नागरिकांसाठी बंद करण्यात आला आहे. मात्र, इतर देशातील नागरिक ह्या रस्त्याने जाऊ शकतात आणि आपापल्या देशाच्या विमानांनी आपल्या देशातही जाऊ शकतात, अशी माहिती तालिबान्यांकडून देण्यात आली.

Exit mobile version