समुद्र देवतेचे पूजन करून नौका समुद्रावर झेपावणार

| मुरूड-जंजिरा | वार्ताहर |

शासकीय आदेशानुसार 1 ऑगस्टपासून समुद्रातील मासेमारीस परवानगी दिली असली तरी परंपरेप्रमाणे नारळी पौर्णिमेला वरुणदेवतेचे पूजन आणि मनोभावे प्रार्थना करून महाराष्ट्र, गोवा, गुजरात आदी किनारपट्टीवर मासेमारीचा हंगाम खऱ्या अर्थाने सुरू होतो, असे आजही दिसून येते. वरुणदेवता ही समुद्र देवता असल्याने नारळी पौर्णिमेला सागराला विधीवत श्रीफळ अर्पून समुद्राला शांत होण्याची प्रार्थना केली जाते. आधुनिक काळातदेखील ही शेकडो वर्षांपासूनची परंपरा अतिशय श्रद्धेने जपली जात आहे.

मुरूड तालुक्यात बुधवारी रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा सण उत्साहात परंपरेप्रमाणे साजरे झाले. मुरूड शहर, राजपुरी, एकदरा, मजगाव, नांदगाव, बोर्ली ठिकाणी आदी श्रीफळाची सवाद्य मिरवणुका निघाल्या होत्या. समुद्रात श्रीफळ अर्पण करण्यासठी समुद्रकिनारी मोठा जनसमुदाय उपस्थित असल्याचे दिसून आले. यावेळी सागरपूजन आणि श्रीफळ अर्पून समुद्राला शांत होण्याची प्रार्थना करण्यात आली. अक्षय तृतीयेला उचंबळणारा समुद्र श्रावण पौर्णिमेला शांत होतो, अशी कोळी बांधवांची श्रद्धा आहे.

मासे पकडण्यासाठी समुद्रात गेलेल्या पतीचे रक्षण करावे म्हणून काही ठिकाणी कोळी महिला समुद्रात राखी सोडतात, श्रावणी नावाचा विधीदेखील केला जातो. बुधवारी सायंकाळी मुरूड मध्ये दरवर्षीप्रमाणे शहर मित्र मंडळाची श्रीफळाची मिरवणूक लक्ष्मीखार येथील श्रीदेव बापदेव मंदिरातून काढण्यात आली. मिरवणुकीत सर्वश्री माजी नगरसेवक प्रमोद भायदे, शिवसेना (उबाठा) शहर प्रमुख आदेश दांडेकर, माजी तहसीलदार नयन कर्णिक, मुरूड सुपारी संघ चेअरमन अविनाश दांडेकर, महेश भगत, अशोक कमाने आदी नागरिक सहभागी झाले होते तर मुरूड नवापाडा कोळीसमाजा तर्फे श्रीफळाची भव्य मिरवणूक समाज अध्यक्ष यशवंत सवाई, गावपाटील भारत पाटील, विश्वस्त गजानन तरे, पंच विराज मकू, माजी अध्यक्ष बाळकृष्ण गोंजी, महिला मंडळ अध्यक्ष अरुणा मकू,प्रयाग वरसोलकर, मंगला नांदगावकर,अरुण केंडू, ऋषिकेश बैले, माजी अध्यक्ष मनोहर बैले, चिंतामणी मकू आदींच्या मार्गदर्शना खाली काढण्यात आली होती. महिला आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.एकदरा , राजपुरी आदी ठिकाणी देखील श्री फळाची मोठ्या प्रमाणावर मिरवणूक सायंकाळी निघाल्या होत्या.

मच्छिमार सज्ज
गुरुवार, शुक्रवारपासून मुरूड, श्रीवर्धन तालुका किनारपट्टीवरून सुमारे 1 हजार नौका मच्छिमारीसाठी निघणार असल्याची माहिती मच्छिमारांनी बुधवारी दिली. दिघी, राजपुरी, भरडखोल, एकदरा, मुरूड, नांदगाव, बोर्ली, कोर्लई आणि अन्य भागातील नौका नारळी पौर्णिमेनंतर मासेमारीस जाण्यासाठी सज्ज असल्याचे राजपुरी येथून मच्छिमाार धनंजय गिदी, एकदरा येथील हनुमान मच्चीमार सहकारी संस्थेचे चेअरमन पांडुरंग आगरकर, यांनी दिली. सध्या बोंबील, कोलंबी, मांदेलीचा सिझन असला तरी एकूण हवामानाचा अंदाज घेता पापलेट, रावस, सुरमई मासळी देखील मिळेल अशी अपेक्षा मच्चीमार बांधवांनी व्यक्त केली आहे. सागराला श्रीफळ अर्पण केल्यानंतरच खऱ्या अर्थाने पारंपारिक मासेमारी सुरू होते अशी माहिती अनेक मच्छिमारांनी दिली.
Exit mobile version