काम न दिल्यास आंदोलन; सुरक्षा रक्षकांचा इशारा

। नवीन पनवेल । वार्ताहर ।

आस्थापनेने कमी केलेल्या जुन्या नोंदीत सुरक्षा रक्षकांना मंडळाकडून आठ महिन्यांपासून कामापासून वंचित ठेवले आहे. त्यामुळे या सुरक्षा रक्षकांना लवकरात लवकर कामावर तैनात करावे अन्यथा सुरक्षा रक्षकांसमवेत ठिय्या आंदोलन करणे रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक व बांधकाम कामगार मजदूर युनियन संघटनेला भाग पडेल, असा इशारा अध्यक्ष/सचिव यांना देण्यात आला आहे.

जुन्या तसेच आस्थापनेने कामावरून कमी केलेल्या सुरक्षा रक्षकांना शासनाच्या नियमानुसार आस्थापनेने सुरक्षा रक्षक कमी करण्याआधी एक महिना आगाऊ नोटीस रायगड मंडळाला बजावली असतानादेखील त्या सुरक्षा रक्षकांना तात्काळ मंडळाकडून दुसर्‍या आस्थापनेत कामाकरिता तैनात न करता आजतागायत सात-आठ महिने प्रतिक्षा यादीवर ठेवून कामापासून वंचित ठेवलेले आहे. त्यामुळे कामगारांवर आताच्या महागाईच्या काळात जगणे असहय झाले आहे. तसेच सुरक्षा रक्षकांची आर्थिक परिस्थिती बिघडल्यामुळे मानसिक स्थिती खालावलेली आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडण्याअगोदर एक महिन्याच्या आत सुरक्षा रक्षकांना कामकाज आस्थापनेवर तैनात करून सहकार्य करावे, अन्यथा सुरक्षा रक्षकांसमवेत ठिय्या आंदोलन करणे संघटनेला भाग पडेल, असे रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाला दिलेल्या पत्रात विनायक गांधी यांनी म्हटले आहे.

Exit mobile version