सरपंच, ग्रामसेवकावर गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ
| रोहा | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील ऐनघर ग्रामपंचायतीमध्ये सुमारे सव्वा कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे पंचायत समिती रोहा यांनी नेमलेल्या चौकशी अधिकार्यांच्या चौकशीत निष्पन्न झाले. या चौकशी मध्ये तत्कालीन सरपंच ,ग्रामसेवक व ग्रामपंचायत सदस्य यांनी संगनमताने हा अपहार केल्याचे दिसून आल्याने राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी कोकण आयुक्त यांचे आदेश कायम ठेवत संबंधित दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.प्रत्यक्षात मात्र गुन्हा दाखल न करता संबंधित भ्रष्टाचारी ग्रामसेवक, सरपंच आणि सदस्य यांना पाठीशी घालण्याचे प्रशासनाचे धोरण दिसून येत असल्याने तक्रारदार हवालदिल झाले आहेत.
ग्रामपंचायतीमध्ये आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये 34,34,713 रुपयांचा तर 2020-21 या वर्षात 9098,023 रुपयांचा अपहार तत्कालीन ग्रामसेवक ए पी मेश्राम, दिपक चिपळूणकर ,सरपंच चंद्रकांत शिद व सदस्य मनोहर सुटे,सुनिल सुटे,विनोद निर्गुडे,रमेश शिरसे,संतोष लाड,उज्वला जवके,प्रणाली रेडकर,आदिती जंगम,देवकी शिद,मंजुळा पवार,सौ गायकर व अन्य सदस्यांनी केल्याचा ठपका रोहा पंचायत समितीचे चौकशी अधिकारी जी एल वायळ यांनी ठेवला होता.ग्रामपंचायत लेखा परीक्षण अहवालात देखील सदर संपूर्ण रकमेची वसुली करण्यात यावी असे नमूद केले आहे.तरी देखील या भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आणि अपिलाचे गुर्हाळ सुरूच असून संबंधित भ्रष्टाचार करणार्या व्यक्तींना वाचवण्यासाठी प्रशासनाकडून निरनिराळ्या शक्कल लढवल्या जात असल्याने तक्रारदार यांची विविध कार्यालयात न्याय मिळणेकामी वणवण सुरूच आहे.
संबंधित दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल झाला नसल्याने जिल्हा परिषद कार्यालय रायगड येथे 13 मार्च 2023 रोजी उपोषणाला बसण्याची तक्रारदार यांनी प्रशासनाला नोटीस दिल्यानंतर पुन्हा एकदा तालुका स्तरीय चौकशी समिती नेमून चौकशी करत असल्याचे उत्तर उप मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद यांनी तक्रारदार यांना दिले आहे. एकूणच प्रशासनाचा कारभार म्हणजे आंधळं दळतय आणि कुत्र पिठ खातय असाच दिसून येत आहे.कारण 4 जानेवारी 2017 शासन परीपत्रकानव्ये ग्रामपंचायत मधील झालेल्या अनियमितता किंवा गैरव्यवहारास सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी जबाबदार असल्यास यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा तात्काळ दाखल करण्यात यावा.
आणि त्यांच्या विरुद्ध संबंधित गटविकास अधिकारी यांनी फौजदारी गुन्हे दाखल करावेत.अपहाराची रक्कम निश्चित करण्यात आलेली आहे याबाबत फौजदारी गुन्हा दाखल करणे बरोबरच अपहाराची रक्कम विना विलंब प्रचलित नियमानुसार वसूल करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.तरी देखील गुन्हा दाखल न करता भ्रष्टाचारी लोकांना सन्माननीय मंत्री महोदय,आयुक्त यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविण्याचे काम रायगड जिल्हा परिषद प्रशासन व रोहा पंचायत समिती प्रशासन करत असल्याचा आरोप संबंधित तक्रारदार यांनी केला आहे.तसेच भ्रष्टाचारी व्यक्तींना जाणीवपूर्वक पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असल्याने प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आहे.