| मध्य प्रदेश | वृत्तसंस्था |
मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे हवाई दलाचे लढाऊ विमान शेतात कोसळल्याची घटना घडली आहे. यात विमान पूर्ण जळून खाक झाले आहे. सुदैवाने लढाऊ विमानातील दोन्ही पायलट पूर्णपणे सुरक्षित आहेत. विमान अपघाताची कारणे अद्याप समजू शकलेली नाहीत.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि.6) दुपारी 2.20 वाजता हवाई दलाचे मिराज 2000 लढाऊ विमान मध्य प्रदेशातील शिवपुरीच्या करायरा तालुक्यात कोसळले. संरक्षण अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार विमानाने नियमित प्रशिक्षण उड्डाण घेतल्यानंतर काही वेळाने ते कोसळले. अपघाताचे कारण शोधण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, अपघातग्रस्त मिराज २००० विमानाचे वैमानिक जखमी झाले आहेत पण ते सुरक्षित आहेत. हे लढाऊ विमान ट्विन सीटर होते. विमान अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने तातडीने घटनास्थळी एक पथक पाठवले. दरम्यान, पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. विमान कोसळल्यानंतर ते पूर्णपणे जळून खाक झाले. त्याचा व्हिडिओही समोर आला आहे. शिवपुरी जिल्ह्यातील बहरेता सानी गावाजवळील एका शेतात भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान कोसळल्यानंतर त्याला आग लागली. धूर दिसताच गावातील लोक घटनास्थळाकडे धावू लागले. काही वेळातच गावकऱ्यांची गर्दी त्या ठिकाणी जमली.