। मुंबई । वृत्तसंस्था ।
गेल्या काही दिवसांपासून दसरा मेळाव्यावरून राज्याचं राजकीय वातावरण तापलं आहे. याआधी शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होणार असल्याची माहिती समोर येत होती. मात्र, हा दसरा मेळावा शिवतीर्थावरच व्हायला हवा अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडली आहे. यावरून अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे.
दसरा मेळावा शिवतीर्थ अर्थात शिवाजी पार्क मैदानावर घेण्यासाठी शिवसेना आणि शिंदे गटात जोरदार चढाओढ सुरु आहे. या वादात आता विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी देखील उडी घेतली आहे. शिंदे गटाला अजित पवारांनी चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.
‘शिवाजी पार्कच्या सभेत बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटलं होतं की माझे आता वय झाले आहे. शिवसेनेचे या पुढील नेतृत्व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहा. बाळासाहेबांनी याबाबत त्यांच्या पुतण्याला ही बाजूला केले होते. हे आमदार मात्र तिकडे पळाले. शिंदे गटातील आमदारांना सत्तेची मस्ती, नशा चढली आहे.
आता बाळासाहेब हयात असते तर एकनाथ शिंदे यांची बिन पाण्याने केली असती, अशा खरमरीत टीका अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.