आक्षीचा पूल वाहतुकीस धोकादायक

पुलावरील लोखंडी सळ्या बाहेर, अपघात होण्याची भीती
| चौल | प्रतिनिधी |

आक्षी येथील जुला पूल जीर्ण झाल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न लक्षात घेत सात-आठ वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने याठिकाणी नव्याने पूल बांधला आहे. परंतु, पुलाच्या बांधकामात वापरण्यात आलेल्या लोखंडी सळ्या बाहेर आल्याने अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे. आधीच रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवास त्रासदायक झाला असताना, आता पुलाच्या दुरवस्थेमुळे नागरिक, प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

अलिबागपासून सहा किलोमीटर अंतरावर असणार्‍या अलिबाग-मुरुड या मुख्य रस्त्यावर असणार्‍या आक्षी पुलावरुन दररोज छोट्या-मोठ्या अशा हजारो वाहनांची ये-जा करतात. याठिकाणी आधी असलेला पूल जीर्ण झाल्याने वाहतूक करण्यासाठी लायक नव्हता. हा पूल अवजड वाहतुकीमुळे कधीही कोसळून पडेल, अशा स्थितीत होता. यावरुन याठिकाणी नव्याने पूल बांधण्याची मागणी करण्यात आली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी नवीन पूल बांधला आहे.

मात्र, सद्यःस्थिती पुलाच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या लोखंडी सळ्या अर्धवट बाहेर आल्याने वाहनचालकांना वाहन चालविताना त्रास होत आहे. कधी कधी घाईगडबडीत आलेल्या सळ्यांकडे लक्ष जात नसल्याने त्या सळ्यांमध्ये वाहनाचे चाक अडकून अपघात होण्याची शक्यता आहे. याचा अधिक फटका सायकलस्वार, दुचाकी आणि तीनचाकी वाहनांना बसून अपघाताची भीती व्यक्त होत आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष
पावसाळा सुरू होताच रस्त्यांवरील खड्ड्यांनी डोके वर काढले आहे. आक्षीच्या पुलावर खड्डे पडून लोखंडी सळ्या बाहेर आल्या आहेत. यामुळे अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता असूनही खड्डे बुजवण्याकडे संबंधित प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे खड्ड्यात एखाद्याचा बळी गेल्यानंतरच रस्ते चांगले होणार का, असा प्रश्‍न नंदकुमार वाळंज यांनी केला आहे. तसेच रात्रीच्या वेळी या पुलावर अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते. तरी, याठिकाणी पथदिवे बसविण्यात यावेत, अशी मागणीही श्री. वाळंज यांनी केली आहे.

पुलाच्या दोन्ही बाजूला पडलेले खड्डे आणि पुलावर खड्डे पडून सळ्या बाहेर पडल्या आहेत. याबाबत आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधून याबाबत तातडीने उपाय करण्याची मागणी केली होती. त्यावर पुलाच्या दोन्ही बाजूचे खड्डे भरण्यात आले. परंतु, पुलावरील खड्डे न बुजविल्याने आज प्रवास करणे धोकादायक ठरले आहेत. तरी, तात्काळ उपाययोजना करावी.

– नंदकुमार वाळंज, सरपंच, आक्षी ग्रामपंचायत

नोकरीनिमित्त नागाववरुन अलिबागला जाण्यासाठी हा एकच मार्ग असल्याने दररोज या पुलावरुन मला प्रवास करावा लागतो. परंतु, या सळ्या बाहेर पडलेला खड्डा लक्षात येत नाही, किंवा समोरुन एखादे वाहन आल्यास खड्ड्यातून जाण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे खूप त्रास होतो.

– प्रवीणा तारकर, प्रवासी, नागाव
Exit mobile version