| सुधागड-पाली | वार्ताहर |
वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्गावरील पाली गावालगत असणार्या अंबा नदीवर नवीन मोठ्या पुलाचे काम सुरू आहे. मात्र, पुलाच्या मोठ्या लोखंडी सळ्या बाहेर निघून जुन्या पुलाजवळ आल्या आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
येथील जुन्या पुलावरून सतत रहदारी सुरू आहे. अशावेळी नवीन पुलाच्या बाहेर आलेल्या लोखंडी सळ्या वाहनचालक व प्रवाशांना धोकादायक ठरत आहेत. एखादे वाहन पुलाच्या बाजूला गेल्यास या सळ्या लागून दुर्घटना होण्याची दाट शक्यता आहे. तसेच एखादे वाहन पाण्यातदेखील पडू शकते. सळ्या लागून गंभीर दुखापत होऊ शकते. रात्रीच्या वेळी तर धोका अधिक वाढतो. मात्र, परिस्थितीकडे एमएसआरडीसीसी प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त होत आहे. या नवीन पुलाचे काम चार वर्षांपासून सुरू आहे. मात्र, चार वर्षे उलटूनही नवीन पूल अजून पूर्ण झालेला नाही. या अपूर्ण कामामुळे प्रवासी व वाहनचालकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
नवीन पुलाचे काम लवकर करणे आवश्यक आहे. या बाहेर निघालेल्या सळ्यांमुळे अपघाताचा धोका आहे. एमएसआरडीसी प्रशासनाने याची वेळीच दखल घ्यावी, अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकते.
प्रकाश पालकर, ग्रामस्थ, पाली
ही बाब गंभीर आहे. या संदर्भात लागलीच उपाययोजना करण्यात येईल. आगामी काही दिवसांत येथील काम पूर्ण केले जाईल.
सचिन निफाडे, उपअभियंता, एमएसआरडीसी