रायगड हॉस्पिटल मधील घटना
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील बार्डी गावातील महादेव राघो कांबरी यांचे शस्त्रक्रियेनंतर चार दिवसांनी श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यांनंतर निधन झाले होते. त्यावेळी मृताच्या नातेवाईक यांनी तेथे सेवेत असलेल्या डॉक्टरांना मारहाण केली होती. त्याबाबत डॉक्टरांनी नेरळ पोलिसांना आपल्या मारहाणीची तक्रार दिली होती. दरम्यान, नेरळ पोलिसांनी चौकशीअंती बार्डी गावातील तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
रायगड हॉस्पिटल येथे बार्डी गावातील मधुकर राघो कांबरी हे आपल्या शरीरातील पित्ताशय आणि हर्निया यांच्यावरील उपचारासाठी 10 फेब्रुवारी रोजी दाखल झाले होते. त्यांच्यावर उपचार करीत असताना 16 फेब्रुवारी रोजी शस्त्रक्रियादेखील झाली होती. त्यानंतर त्यांना आयसीयू वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना बरे वाटत असल्याने 21 फेब्रुवारी रोजी डिस्चार्ज देण्यात येणार होता. परंतु, त्याआधीच मधुकर कांबरी यांना अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला व त्याचे छातीत दुखू लागले. म्हणुन तेथील डॉक्टर अमर कांबळे यांनी त्यास तात्काळ आयसीयूमध्ये उपचाराकामी आणले. त्यांना व्हेंटिलेटर लावण्यात आला होता आणि त्याला साथ देत नसल्याने दुपारी अडीच वाजता रुग्णाचा मृत्यू झाल्याचे त्यांच्यावर शस्त्रक्रिया तसेच उपचार करणारे डॉ. मयूर चंदन रुपावत यांनी जाहीर केले होते.
दरम्यान, कांबरी यांच्या तीन नातेवाईक यांनी डॉक्टर रूपावत तसेच सोबत असलेल्या सर्व स्टाफला शिवीगाळ करून गोंधळ घालण्यास सुरुवात केला होती. त्यावेळी डॉ. रुपावत यांना तसेच सोबत असलेले डॉ. कौषीक मराठे यांना मारहाण केली, तसेच बघून घेण्याची धमकी दिली. याबाबत डॉ. मयूर रूपावर यांनी नेरळ पोलिसात तक्रार दिली होती. त्या तक्रारीवरून नेरळ पोलिसांनी चौकशीअंती बार्डी गावातील तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. नेरळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर या घटनेचा करीत असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.