निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासन ठरले फेल; नागरिकांसह प्रवाशी वर्गाकडून संतापाची लाट
। अलिबाग । प्रतिनिधी ।
मागील निवडणूकीपुर्वी अलिबाग-रोहा रस्ता स्वखर्चाने करून देण्याचे अमिष विद्यमान आमदारांनी दाखविले होते. त्यामुळे मोठ्या विश्वासाने मतदारांनी मतदान करून त्यांना निवडून दिले. परंतु त्यांनी मतदारांची घोर निराशा केल्याचे समोर आले आहे. अलिबाग-रोहा रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून रस्त्यावर खडीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे हा रस्ता जीवघेणा ठरण्याची भिती निर्माण झाली आहे. पाच वर्षे उलटूनही विद्यमान आमदारांनी सुखकर रस्ता करून न दिल्याने नागरिकांसह प्रवासी वर्गाकडून संतापाची लाट उसळल्याचे चित्र आहे.
हॅममधून मंजूर होऊन अपूर्णावस्थेत असणारा अलिबाग-रोहा रस्ता आता खड्ड्यांमुळे जाम झाला आहे. रस्ता निर्मितीला सुरुवात झाली. तेव्हा श्रेयवादासाठी महायुतीमधील नेत्यांमध्ये झालेली हमरीतुमरी जनतेने अनुभवली आहे. रस्त्याला पडलेल्या खड्ड्यांचे श्रेय घेण्यासाठी मात्र महायुतीचे नेते पुढे येताना दिसत नाही. खानाव ते सुडकोली हा प्रवास अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे. खास करून नांगरवाडी ते भागवाडी मधील खिंडीची अवस्था दयनीय झाली आहे. या खिंडीमध्ये रस्ता उखडला गेल्याने वाहनचालकांना वाहने चालविणे जिकरीचे बनले आहे.
अलिबाग-रोहा मार्गावरील वळवली ते गेल कंपनीपर्यंत रस्त्याच्या एका बाजूकडील काँक्रीटीकरण करण्यात आले. त्याला एक वर्ष होऊनदेखील दुसरी बाजू करण्यास ठेकेदार उदासीन ठरला. दुसर्या बाजुला पावसाने चिखल केल्याने त्यावर आता ठेकेदारामार्फत जेएसडब्लू कंपनीमधील रॉ मटेरिअल टाकून खड्डे बूजवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या खडीचे साम्राज्य काँक्रीट रस्त्यावर आल्याने वाहने चालविणे धोकादायक बनू लागले आहे. अपघात होण्याची भिती निर्माण झाली आहे. अलिबागपासून रोहा-साईपर्यंत 84 किलो मीटरच्या रस्त्यासाठी 157 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या रस्त्याचे 50 टक्के काम झाल्याचा दावा बांधकाम विभागाकडून केला जात आहे. परंतु अलिबाग-रोहा मार्गावरील सुडकोलीपासून अलिबागपर्यंतच्या रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे.
कोट्यावधी रुपये खर्च करून रस्त्यावरील खडी उखडली असल्याने दुचाकी वाहने घसरून अपघात होत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. विद्यमान आमदारांनी अनेक वेळा या रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन केले. परंतु पाच वर्षात हा रस्ता पुर्ण करण्यास अपयशी ठरल्याने या मार्गावरील प्रवासी वर्गाकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. रस्त्याचे काम संथगतीने सुरु झाल्याने अलिबाग-सुडकोली मार्गावरील प्रवाशांना प्रचंड त्रास होत आहे. अनेकवेळा एसटी बसेसदेखील या रस्त्यावर बिघडत आहेत. विद्यमान आमदारांनी चांगल्या रस्त्याचे स्वप्न दाखविले आहे, ते स्वप्नच राहिल्याची प्रतिक्रीया जनमानसातून उमटत आहे.
रस्त्याच्या कामावर दृष्टीक्षेप
अलिबाग ते साई पर्यंतचा रस्ता - 84 किलो मीटर
बांधा वापरा आणि हस्तांतरण करा या धर्तीवर रस्त्याचे काम
रुंदीकरण, डांबरीकरण व मजबूतीकरण या नुसार रस्त्याचे काम
157 कोटी रुपयांचा निधी मंजूर
काँक्रीटीकरणासह रुंदीकरणाचे काम अपुर्णच
रस्त्यावर ठिकठिकाणी खडी, खड्डयाचे साम्राज्य