पाच वर्षांपूर्वी थाटामाटात भूमीपूजन; अद्याप साधी वीटही रचलेली नाही
| अलिबाग | प्रमोद जाधव |
अलिबाग तालुक्यातील उसर या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारले जाणार आहे. या महाविद्यालयाच्या कामाचे भूमीपूजन पाच वर्षांपूर्वी करण्यात आले. मात्र, अद्यापपर्यंत या जागेत साधी वीटही बसविण्यात आली नाही. महाविद्यालयाच्या इमारत उभारणीच्या कामाला अद्याप पर्यावरण विभागाची परवानगी मिळालेली नसल्याने प्रत्यक्ष कामाला सुरूवात झालेली नाही, अशी माहिती महाविद्यालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे हे विद्यालय प्रत्यक्षात कधी उभे राहणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ज्या जागेत बांधले जाणार आहे, ती जागा क्रिकेट खेळण्याचे मैदान होते. पंचक्रोशीतील वेगवेगळ्या मंडळांमार्फत शनिवार व रविवारी क्रिकेटच्या स्पर्धा भरविल्या जात होत्या. त्यामुळे ही जागा मैदानासाठी प्रसिद्ध होती. मात्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी ही जागा ताब्यात घेण्यात आल्याने क्रीडाप्रेमींची मोठी घोर निराशा झाली. गेल्या पाच वर्षांपूर्वी कोरोनानंतर उसर येथे 52 एकर जागेत शासकीय वैद्यय महाविद्यालय उभारण्याच्या हालचाली सुरु झाल्या. मोठा गाजावाजा करीत या कामाचे भूमीपूजन करण्यात आले होते. त्यामुळे महाविद्यालयाबरोबरच दोन टप्प्यात होणाऱ्या रुग्णालय, ग्रंथालय, वसतिगृह या वास्तूंचे काम लवकरच सुरु होईल, अशी आशा अलिबागकरांसह जिल्ह्यातील नागरिकांना होती. मात्र, नागरिकांची फार मोठी निराशा झाली आहे.
वैद्यकीय महाविद्यालयाचे काम सुरुवातीला ईपीआयएल कंपनीकडे सोपविण्यात आले होते. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे त्यांचा हा ठेका रद्द करण्यात आला. त्यानंतर रॅक इन्फ्रास्ट्रक्चरकडे ठेका सोपविण्यात आला आहे. केंद्र सरकारकडून मंजूर झालेल्या निविदा प्रक्रियेतून या एजन्सीला काम देण्यात आले आहे.
या प्रकल्पासाठी राज्य शासनाकडून 406 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी ईडीबी बँकेकडून अर्थसहाय्य घेण्यात येणार आहे. हा प्रकल्प उभारण्यासाठी माती परीक्षणदेखील झाले. परिसरातील गुरचरण जागा ताब्यात घेण्यात आली. या जागेत पत्र्याचे कुंपणदेखील लावण्यात आले. मात्र, गेल्या पाच वर्षांत या जागेमध्ये साधी वीटही लावण्यात आली नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाला गती नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. सध्या शासकीय वैद्यकीय विद्यालय अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यरत असून, वसतिगृह अलिबाग तालुक्यातील कुरुळ येथील आरसीएफ कर्मचारी वसाहतीमधील इमारतीमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. आतापर्यंत दोनशेहून अधिक विद्यार्थी डॉक्टरची पदवी घेऊन बाहेर पडले आहेत. मात्र, अजूनपर्यंत हक्काचे वैद्यकीय विद्यालय उभे राहिलेले नाही.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत उभारण्यासाठी पर्यावरण विभागाची परवानगी घेतली जाणार आहे. या विभागाकडून मान्यता मिळाल्यावर लवकरच बांधकाम सुरु होईल.
डॉ. पूर्वा पाटील, अधिष्ठता,
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय