| अलिबाग | प्रतिनिधी |
संसदेमध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी ज्या पद्धतीने अभ्यासपूर्ण मांडणी करत आहेत, ती पाहता सत्ताधाऱ्यांकडे त्यांच्या प्रश्नांची कोणतीही उत्तरे उरलेली नाहीत. राहुल गांधी बोलायला उभे राहिले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशातील महत्त्वाचे मंत्री सभागृह सोडून निघून जातात, ही वस्तुस्थिती आज संपूर्ण देश पाहात आहे, असा थेट आणि गंभीर आरोप शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी केला. केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीवर त्यांनी जोरदार हल्लाबोल करत देशात अपेक्षेपेक्षाही वेगाने राजकीय परिवर्तन होणार असल्याचा दावा केला.
जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित एका दिमाखदार अभिष्टचिंतन सोहळ्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देशातील राजकीय बदलांचे संकेत देत इंडिया आघाडीच्या वाढत्या प्रभावावर मोठा विश्वास व्यक्त केला.
देशातील सद्य राजकीय स्थितीवर बोलताना जयंत पाटील म्हणाले, मला पूर्ण आत्मविश्वास आहे की देशातील राजकीय वातावरण बदलणार आहे. मी नेहमीच माध्यमांशी बोलताना हे सांगत आलो आहे. परंतु, सध्या ज्या गतीने हे बदल घडतील असे मला वाटत होते, त्यापेक्षाही अधिक वेगाने आता बदल घडून येतील. देशात विरोध अधिक तीव्र होत असून, सध्या समोर येत असलेले विविध घोटाळे अत्यंत भयंकर आणि टोकाचे आहेत. हे घोटाळे समोर आल्यानंतर काम अधिक वेगळ्या पद्धतीने आणि गतीने होईल.
इंडिया आघाडीचे सदस्य म्हणून संसदेतील अनुभवाचा दाखला देत जयंत पाटील यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भूमिकेचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले, राहुल गांधी ज्या अभ्यासूपणे संसदेत आणि पार्लमेंटच्या बैठकांमध्ये काम करत आहेत, ते कौतुकास्पद आहे. जेव्हा ‘इंडिया’ आघाडीमध्ये विविध विषयांवर चर्चा होते, तेव्हा राहुल गांधी अत्यंत व्यापक आणि प्रभावीपणे शेवटचा विचार मांडतात. त्यांच्या या भूमिकेमध्ये सर्वसामान्य, गरीब आणि बहुजन समाजाचे हित कसे साधता येईल, याची एक प्रामाणिक तळमळ दिसून येते.
राहुल गांधी यांच्या संसदेतील भाषणांना आणि त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना ज्या पद्धतीने प्रसिद्धी मिळायला हवी होती, तशी ती मिळत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. राहुल गांधी यांच्या भूमिकेवर देशात जी चर्चा व्हायला पाहिजे, ती सध्या होताना दिसत नाही. मात्र, सर्वसामान्य जनता ही परिस्थिती अत्यंत जवळून अनुभवत आहे, असेही पाटील यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला शेकापचे अनेक प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जयंत पाटील यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.











