गणेशोत्सव तोंडावर असताना सुविधांचा अभाव
प्रवाशांना पाण्यात उभे राहण्याची वेळ
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
गणेशोत्सव अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपला असतानाही जिल्ह्याच्या ठिकाणचे अलिबाग एसटी स्थानक मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. साचलेल्या पाण्याचा निचरा नाही, स्थानकात मोठमोठे खड्डे, बंद स्वच्छतागृह, अस्ताव्यस्त कचरा आणि बस सुटण्यास होणारा विलंब अशा समस्यांनी स्थानकाची अवस्था बिकट झाली आहे. लाखो रुपयांचे उत्पन्न देणाऱ्या आगाराला प्रवाशांना मात्र सुविधांच्या नावाने गैरसोयींचाच प्रवास करावा लागत असल्याचे चित्र आहे.
अलिबाग एसटी स्थानक 40 वर्षांहून अधिक जुने आहे. अलिबाग आगारात अडीचशेहून अधिक कर्मचारी असून, त्यामध्ये दीडशेहून अधिक चालक व वाहकांचा समावेश आहे. स्थानकात 68 एसटी बस असून, एसटीला महिन्याला सुमारे पाच कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. अलिबाग तालुक्यासह विविध भागांतील हजारो प्रवासी एसटीतून प्रवास करतात.
जिल्ह्याचे ठिकाण असल्याने अलिबागमध्ये शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये मोठ्या संख्येने आहेत. नोकरी, शिक्षण आणि पर्यटनासाठी दररोज मोठ्या प्रमाणात नागरिक अलिबागमध्ये येतात. मात्र प्रवाशांच्या या वाढत्या संख्येच्या तुलनेत स्थानकातील सुविधा अपुऱ्या पडत आहेत.
स्थानकातील ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. याच खड्ड्यांमधून एसटी बसची ये-जा सुरू असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. फलाटावर पाण्याचा निचरा होण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्याने पावसाचे पाणी साचून राहते. त्यामुळे एसटीची वाट पाहताना प्रवाशांना चक्क साचलेल्या पाण्यात उभे राहावे लागते.
सामाजिक बांधिलकीतून बांधण्यात आलेले स्वच्छतागृहही बंद अवस्थेत आहे. परिसरात अस्वच्छता असून, गवताचे साम्राज्य पसरले आहे. हिरकणी कक्षाच्या बाजूलाही कचऱ्याचा ढिगारा साचला आहे. स्थानकाच्या स्वच्छतेसाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती असतानाही कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात यंत्रणा अपयशी ठरत असल्याचे दिसून येते.
गणेशोत्सवात अलिबाग स्थानकात नियमित प्रवाशांसह पर्यटकांची मोठी गर्दी होणार आहे. सण काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाही स्थानकातील मूलभूत समस्या कायम असल्याने आगार व्यवस्थापनाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानक समस्यांच्या विळख्यात असताना आगार व्यवस्थापक मात्र, या समस्यांबाबत अनभिज्ञ असल्याचा आरोप प्रवासी वर्गातून होत आहे.
स्थानकातील स्वच्छतागृह का बंद आहे, याची माहिती नाही. मात्र, याबाबत पडताळणी केली जाईल. स्थानकाचा परिसर स्वच्छ ठेवण्याची सूचना संबंधितांना केली जाईल.
– राकेश देवरे, आगार व्यवस्थापक, अलिबाग







