58 लाखांचा दंड दीड वर्षांपासून वसुलीविना
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
वैजाळी येथील अनधिकृत भरावप्रकरणी 58 लाख 62 हजार रुपयांचा दंड ठोठावण्याबाबत नोटीस बजावून दीड वर्ष उलटले, तरी प्रत्यक्ष दंडवसुली झालेली नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते संदेश मोकल यांनी केला आहे. महसूल विभागाचा पंचनामा आणि दंडात्मक कारवाईची प्रक्रिया होऊनही वसुलीला विलंब होत असल्याने अलिबागचे तहसीलदार संशयाच्या भोवऱ्यात सापडल्याची चर्चा सुरू झाली आहे.
अलिबाग तालुक्यात जमिनींचे दर गगनाला भिडत असताना जमिनींची खरेदी, भराव आणि बांधकामांचे प्रमाण वाढले आहे. मात्र, काही ठिकाणी शासनाचे नियम धाब्यावर बसवून उत्खनन आणि भराव करण्यात येत असल्याच्या तक्रारीही पुढे येत आहेत. वैजाळी येथील सर्व्हे नं. 180 मधील 1,131 चौ.मी. रस्त्याच्या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात उत्खनन करून खडीचा भराव करण्यात आल्याची तक्रार संदेश मोकल यांनी अलिबाग तहसीलदारांकडे केली होती.
तक्रारीची दखल घेत मंडळ अधिकारी व तलाठ्यांनी घटनास्थळी पंचनामा केला. या पंचनाम्यात 399 ब्रास खडीचा अनधिकृत भराव केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार अलिबागचे तहसीलदार विक्रम पाटील यांनी 17 जून 2025 रोजी चंद्रकांत म्हात्रे यांना 58 लाख 62 हजार 507 रुपयांचा दंड का वसूल करू नये, याबाबत सात दिवसांत खुलासा सादर करण्याची नोटीस बजावली होती. अन्यथा महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मधील कलम 45 व 48 (7) अन्वये पुढील कार्यवाही करण्याचा इशाराही देण्यात आला होता.
मात्र, नोटीस बजावून दीड वर्ष होत आले तरी दंडवसुली अथवा ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप मोकल यांनी केला आहे. अनधिकृत भरावाचा पंचनामा आणि दंडात्मक प्रक्रिया झाल्यानंतरही महसूल वसुलीला विलंब होत असल्याने शासनाचा महसूल बुडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणातील तहसीलदारांच्या कार्यवाहीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
परत तपासणीच्या नावाने कागदी खेळ?
वैजाळी येथील अनधिकृत भरावप्रकरणी 58 लाखांचा दंड प्रस्तावित करूनही दीड वर्षानंतर पुन्हा तपासणी करण्याची हालचाल सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. परत तपासणीसाठी मंडळ अधिकाऱ्यांना पत्र काढले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आधी पंचनामा आणि दंडात्मक प्रक्रिया, त्यानंतर दीर्घकाळ वसुलीविना प्रकरण आणि आता पुन्हा तपासणी, या प्रक्रियेमुळे तहसीलदारांकडून कागदी खेळ सुरू असल्याची चर्चा रंगली आहे.
