। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
ग्रामपंचायतीच्या निवडणूकांच्या अर्ज छाननीमध्ये अलिबाग तालुक्यातील सादर करण्यात आलेल्या अर्जांपैकी एकही अर्ज अवैध झाला नाही. त्यामुळे सर्वच्या सर्व उमेदवारी अर्ज वैध ठरल्याने आता निवडणूक रिंगणात सहा ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदाकरिता एकुण 35 अर्ज तर 46 सदस्यपदांच्या जागांसाठी 158 उमेदवार निवडणूक रिंगणात कायम राहिले आहेत. त्यामुळे आता अर्ज मागे घेण्याच्या अखेरची मुदत असलेल्या सात डिसेंबर रोजी किती उमेदवार अर्ज मागे घेणार यावर निवडणूकीचे अंतिम चित्र स्पष्ट होईल.
तालुक्यातील नारंगी ग्रामपंचायतीत थेट सरपंचपदासाठी एकुण सात अर्ज दाखल आहेत. तर सदस्य पदासाठी एकुण 23 अर्ज दाखल आहेत. शिरवलीमध्ये सरपंचपदासाठी एकुण 10, तर सदस्य पदासाठी एकुण 34 अर्ज दाखल झालेत. वैजाली ग्रामपंचायतीत थेट सहा तर सदस्यांसाठी 33 उमेदवार रिंगणात आहेत. बोरीस गुंजीस ग्रामपंचायतीमध्ये थेट सरपंचपदासाठी एकुण चार तसेच सदस्यपदांसाठी एकुण अर्जांची संख्या 22 आहे. त्याचप्रमाणे आक्षी ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदासाठी एकुण चार अर्ज दाखल आहेत. तसेच सदस्यपदांसाठी एकुण 28 अर्ज कायम आहेत. मुळे ग्रामपंचायतीमध्ये थेट सरपंचपदासाठी चार आणि सदस्यपदांसाठी एकुण 18 अर्ज रिंगणात कायम आहेत.
आता 7 डिसेंबर रोजी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत आहे. त्यावेळी खरे लढतीचे चित्र स्पष्ट होणार असल्याने सर्वांचे लक्ष सात डिसेंबरकडे लागले आहे. तर 18 डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. तर 20 डिसेंबर रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे.