सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे: डॉ. बास्टेवाड

जिल्हास्तरीय पाणी गुणवत्ता कार्यशाळा संपन्न

| रायगड | खास प्रतिनिधी |

जनतेला शुद्ध व स्वच्छ पाणी नियमित व पुरेशा प्रमाणात देण्यासाठी ग्रामपंचायतींनी आपली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडावी. तसेच गुणवत्तापूर्ण पाणीपुरवठ्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी केले.

जिल्हास्तरीय पाणी गुणवत्ता कार्यशाळेत ते बोलत होते. ग्रामपंचायत स्तरांवरील पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता चांगली ठेवणे ही ग्रामपंचायतींची जबाबदारी आहे. त्याचबरोबर घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाची कामे प्राधान्याने हाती घ्यावीत, असे डॉ. बास्टेवाड यांनी सांगितले. पाणी गुणवत्ता, रासायनिक व जैविक तपासणी विहीत वेळेत पूर्ण करण्याबाबतच्या सूचना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे यांनी दिल्या.

राज्य पाणी गुणवत्ता सल्लागार डॉ. शैलेश कानडे यांनी पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण मार्गदर्शक सूचना, जलसुरक्षकाचा शासन निर्णय, तपासणी बाबतचा शासन निर्णय, पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण अंमलबजावणीचा शासन निर्णय आदी बाबींवर उपस्थितांना मागदर्शन केले. यावेळी स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील तळा, कर्जत व खालापूर हे तीन तालुके हागणदारीमुक्त प्लस झाले आहेत. या तीन तालुक्यांच्या गट विकास अधिकार्‍यांना डॉ. बास्टेवाड यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता शुभांगी नाखले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत राजेंद्र भालेराव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण निर्मला कुचीक, जिल्हा कृषी अधिकारी मिलिंद चौधरी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version