गावाच्या विकासासाठी सर्वपक्षीय एकजूट

जांभुळपाडा जि.प. संघर्ष समितीची स्थापना
। पाली/बेणसे । प्रतिनिधी ।
गावाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर राजकीय मतभेद न बाळगता एकत्रितपणे काम केले पाहिजे या जाणिवेतून जांभुळपाडा जिल्हा परिषद संघर्ष समितीची स्थापना नुकतीच करण्यात आली आहे. विविध मूलभूत समस्या सोडवून गावांच्या विकासासाठी ग्रामस्थांसह सर्व पक्ष या संघर्ष समितीमध्ये सहभागी झाले आहेत.

परळी ग्रूप ग्रामपंचायत कार्यालयात सर्वपक्षीय आयोजित बैठकीत जांभूळपाडा जिल्हा परिषद संघर्ष समितीची कमिटी निवडण्यात आली आहे. यावेळी राजकारण विरहित काम करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले आहे. या बैठकीसाठी सरपंच संदेश कुंभार हे अध्यक्ष होते. तर आभार आणि प्रस्तावना अ‍ॅड. भाई कुंभार यांनी केले. या बैठकीत वीज, पाणी रस्ते आदी समस्यांबाबतीत चर्चा करण्यात आली. तसेच तत्काळ एमएसआरडीसीच्या अधिकार्‍यांना बोलावून त्यांच्या कडून काम का थांबले आहे याची माहिती घेतली. याबरोबरच महावितरणच्या अधिकार्‍यांना निवेदन दिले गेले. यापुढे संघर्ष समिती विविध समस्या व मागण्यांचे निवदने तयार करून संबंधित अधिकार्‍यांना देऊन समस्या सोडविणार आहे. ही समिती गठित करण्याचे काम प्रामुख्याने विठ्ठल सिंदकर यांनी केले आहे.

खर्‍या अर्थाने राजकारण बाजूला ठेऊन विकासकामांच्या बाबतीत ही समिती संघर्ष करणार आहे. असे यावेळी राहुल गायकवाड यांनी सांगितले. या बैठकीत सर्व पक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Exit mobile version