रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे तिन्ही आमदार संपर्क कक्षेबाहेर

। अलिबाग । प्रतिनिधी ।
शिवसेनेचे दुसर्‍या क्रमांकाचे नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या 13 आमदारांसहीत विधान परिषदेच्या निकालानंतरपासून संपर्कात नसल्याने शिवसेनेची धाकधूक वाढलीय. याशिवाय शिवसेनेचे रायगड जिल्ह्यातील अलिबागचे आ. महेंद्र दळवी, कर्जतचे आ. महेंद्र थोरवे तसेच महाडचे आ. भरत गोगावले यांचादेखील संपर्क होत नसल्याने ते देखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.


एकनाथ शिंदे यांच्यासह 13 आमदार संपर्कात नसल्यामुळे राजकीय भूकंप आला आहे. तसेच त्या आमदारांनी बंड पुकारल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. शिवसेनेकडून वारंवार त्या आमदारांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान एकनाथ शिंदे सूरतमध्ये असून त्यांच्यासोबत 12 पेक्षा अधिक आमदार असल्याचं सांगितलं जात आहे. महाविकास आघाडीतील मित्रपक्षांची अनेक मतं फुटल्याचं यावरुन स्पष्ट झालंय. विशेष म्हणजे कालच्या निवडणुकीदरम्यान सचिन आहिर वगळता कोणीही प्रसारमाध्यमांशी चर्चा केली नाही. आमश्या पाडवी आणि आहिर वगळता कोणताही नेता प्रसारमाध्यमांसमोर आला नाही. त्यातच आता एकनाथ शिंदे आणि 13 आमदार पक्षाच्या संपर्कात नसल्याने शिवसेनेची चिंता वाढलीय.


महाडचे आमदार भरत गोगावले, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे या तिन्ही आमदारांनी वारंवार राष्ट्रवादीविरोधातील आपली नाराजी जाहीर केली होती. रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादीचा पालकमंत्री असल्याने त्यांनी विरोध करत तिथे पक्षाचा पालकमंत्री द्यावा, अशी मागणी अनेकदा केली होती. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं होतं. हीच नाराजी एकनाथ शिंदेंसोबत जाण्यासाठी कारणीभूत ठरली असावी असं बोललं जात आहे.

Exit mobile version