स्मार्ट मीटरवरून पुन्हा वाद: संवादाअभावी ग्राहक-महावितरण आमनेसामने

वरसोलीत संमतीशिवाय मीटर बसविण्याचा आरोप

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यात स्मार्ट मीटर बसविण्याच्या मोहिमेला पुन्हा वादाचे ग्रहण लागले आहे. ग्राहकांना विश्वासात न घेता आणि पुरेशी माहिती न देता मीटर बसविण्याचे प्रकार सुरू असल्याचा आरोप होत असून, त्यामुळे महावितरण कर्मचारी आणि ग्राहक यांच्यातील संवादच तुटू लागल्याचे चित्र आहे. अलिबाग तालुक्यातील वरसोली येथील आशिर्वाद हाइट्स सोसायटीत मंगळवारी घडलेल्या प्रकारामुळे हा वाद पुन्हा ऐरणीवर आला आहे.

महावितरणकडून गेल्या वर्षभरापासून रायगड जिल्ह्यात स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू आहे. वीज वितरण अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम करण्याचा उद्देश असला, तरी अनेक ठिकाणी ग्राहकांशी संवाद न साधता मीटर बसविले जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.

वरसोली येथील आशिर्वाद हाइट्स सोसायटीत महावितरणचे कर्मचारी थेट मीटर बसविण्यासाठी दाखल झाल्याचा आरोप रहिवाशांनी केला. यावेळी कोणतीही पूर्वकल्पना किंवा चर्चा न करता काम सुरू करण्यात आल्याने नागरिकांनी आक्षेप घेतला. “प्रथम विश्वासात घ्या, त्यानंतरच मीटर बसवा,” अशी भूमिका रहिवाशांनी मांडली.

यावेळी काही काळ नागरिक आणि कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद झाला. मीटर बसविण्यास विरोध केल्यास वीजजोडणी खंडित करण्याची धमकी देण्यात आल्याचाही आरोप नागरिकांनी केला. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला.

घटनेची माहिती महावितरणचे कार्यकारी अभियंता भगत आणि अपर कार्यकारी अभियंता तायडे यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांशी चर्चा करून विषय शांततेत मार्गी लावला. दरम्यान, अभियंता डफळ यांनी यापूर्वीच मीटर बसविण्याबाबत नोटीस देण्यात आल्याचे सांगितले.

या घटनेनंतर स्मार्ट मीटर बसविताना जनजागृती आणि संवादाचा अभाव पुन्हा एकदा समोर आला असून, ग्राहकांचा विश्वास जिंकण्यात महावितरण अपयशी ठरत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

बैठका झाल्या; पण जनजागृती कुठे?
काही दिवसांपूर्वी अलिबागमध्येही स्मार्ट मीटरवरून ग्राहक आणि महावितरण कर्मचाऱ्यांमध्ये वाद होऊन प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले होते. त्यावेळी शेकाप महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, तालुका चिटणीस सुरेश घरत यांच्या उपस्थितीत पोलीस निरीक्षक प्रवीण पांडे यांच्या दालनात बैठक झाली होती. स्मार्ट मीटरबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करून गैरसमज दूर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, वरसोलीतील ताज्या घटनेतून संवाद आणि जनजागृतीचा अभाव अद्याप कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Exit mobile version