पोलिसांच्या बळावर गेलची दादागिरी

जमिनीवर जबरदस्तीने काम करण्याचा आरोप; कणेगावकरांचा तीव्र विरोध

| पेण | प्रतिनिधी |

शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्याचा प्रयत्न आणि त्याला पोलिसी बळाची साथ, असा गंभीर आरोप करीत पेण तालुक्यातील कणेगावच्या ग्रामस्थांनी गेल कंपनीविरोधात एल्गार पुकारला आहे. जमीन देण्यास नकार देणाऱ्या आणि मोबदला न स्वीकारलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर जबरदस्तीने काम करण्याचा प्रयत्न झाल्याने ग्रामस्थांचा संताप अनावर झाला. कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून दादागिरी सुरू असल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी जोरदार विरोध केला. अखेर वाढता जनक्षोभ पाहून कंपनीच्या अधिकाऱ्यांना गावातून माघार घ्यावी लागली.

कणेगावात गेल कंपनीचे अधिकारी शेतकऱ्यांच्या विरोधाला न जुमानता जमिनीवर काम करण्यासाठी पोहोचले होते. ज्या शेतकऱ्यांनी जमीन देण्यास नकार दिला किंवा कंपनीचा मोबदला स्वीकारला नाही, त्यांच्या जमिनीवरही काम करण्याचा प्रयत्न झाल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले. कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून दादागिरी केली जात असल्याचा आरोप करीत गावकऱ्यांनी कामाला तीव्र विरोध दर्शविला.

यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्याऐवजी पोलिसी बळाचा वापर करून त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. शेतकऱ्यांच्या जमिनी, त्यांची संमती आणि हक्कांचा प्रश्न असताना पोलिसी बळाचा वापर नेमका कोणाच्या हितासाठी केला जात आहे, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला. कंपनीच्या दादागिरीला पोलिसी बळाची साथ मिळत असल्याची भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, पेणचे आमदार रविशेठ पाटील यांनी भ्रमणध्वनीवरून गेल कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आमदारांशी बोलण्यास नकार दिल्याचा आरोप करण्यात आला. लोकप्रतिनिधींशी संवाद साधण्यासही कंपनीचे अधिकारी तयार नसतील, तर स्थानिक शेतकऱ्यांच्या प्रश्नांना ते किती गांभीर्याने घेत असतील, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी केला.

ग्रामस्थांचा वाढता विरोध आणि जनक्षोभ पाहता गेल कंपनीच्या अधिकाऱ्यांना अखेर माघार घ्यावी लागली. कणेगावातील शेतकरी जमिनीच्या हक्कासाठी एकजुटीने उभे राहिले असून, कोणत्याही दबावाला बळी न पडता प्रकल्पाविरोधात पूर्ण ताकदीनिशी लढण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

गेल प्रकल्पासाठी शेतकऱ्यांची संमती, मोबदल्याबाबतचे मतभेद आणि प्रत्यक्ष जमिनीवर काम करण्याच्या पद्धतीवरून संघर्ष तीव्र होत आहे. मात्र, शासन आणि प्रशासनाच्या भूमिकेबाबत ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनीवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा कणेगावकरांनी दिला आहे. प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धारही ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

Exit mobile version