पुस्तकी ज्ञानाबरोबरच अनुभव देखील मोलाचे; जिल्हाधिकार्‍यांचे प्रतिपादन

| अलिबाग | प्रतिनिधी |

गुंतवणूकवृद्धी, निर्यात, व्यवसाय सुलभीकरण व एक जिल्हा एक उत्पादन या विषयांचा अंतर्भाव असलेली एक दिवसीय जिल्हा निर्यात कार्यशाळा जिल्ह्यातील सर्व सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योग क्षेत्रातील निर्यातक्षम उद्योजकांना मार्गदर्शन व्हावे, याकरिता आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेच्या माध्यमातून पुस्तकी ज्ञान व प्रत्यक्ष अनुभव यातील अंतर कमी होऊ शकेल, असा विश्‍वास जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी येथे व्यक्त केला.

उद्योग विभाग, उद्योग संचालनालय आणि लघुउद्योग विकास बँक ऑफ इंडिया आयोजित गुंतवणूक, आयात-निर्यात, व्यवसाय सुलभीकरण, आणि एक जिल्हा एक उत्पादन या विषयावरील जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित जिल्हा निर्यात कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते आज संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी बँक ऑफ इंडियाच्या क्षेत्रीय प्रबंधक श्रीमती शंपा बिश्‍वास, विदेश व्यापार महासंचालनालयाचे महासंचालक सुदर्शन येलाराम, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी.एस.हरळय्या, जिल्हा कृषी अधीक्षक उज्वला बाणखेले, पणन महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक भास्कर पाटील, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक शामकांत चकोर, आंबा निर्यात उद्योजक संदेश पाटील, जिल्ह्यातील निर्यातक्षम कृषी उत्पादन पांढरा कांदा व हापूस आंबा तसेच मत्स्य प्रक्रिया उद्योग करणारे उद्योजक व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत लाभ घेतलेले नवउद्योजक, आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ.कल्याणकर पुढे म्हणाले की, येणार्‍या काळात जिल्ह्यात अनेक उद्योग प्रकल्प उभारले जाणार आहेत. सध्या रायगड जिल्ह्यात 208 लहान मोठे औद्योगिक प्रकल्प असून यामध्ये जवळपास 45 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झालेली आहे तर जवळपास 20 ते 22 हजार लोकांना यातून रोजगार प्राप्त झाला आहे. शासनाच्या एक जिल्हा एक उत्पादन या धोरणांतर्गत रायगड जिल्ह्यात स्टील आणि मत्स्य प्रक्रिया उद्योगांचा समावेश असल्याने या क्षेत्राच्या वाढीस उत्तम वाव आहे. आपल्या राज्यातील निर्यात व्यवसाय वाढविण्यासाठी शासनाचे विविध प्रयत्न सुरू आहेत.

रायगड जिल्हा निर्यात कृती आराखड्यानुसार नियोजित संस्थात्मक व प्रचालनात्मक कामे मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. जेएनपीटी सारखे आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यावसायिक बंदर असून दिघी पोर्टचे कामही प्रगतीपथावर आहे. महाड औद्योगिक विकास महामंडळाचे काम जवळपास 1 हजार हेक्टर जागेत उत्तमरित्या सुरू आहे. रोहा, रसायनी, खालापूर, तळोजा एमआयडीसी चे कामही चांगल्या पद्धतीने सुरु आहे.

डॉ.महेंद्र कल्याणकर
जिल्हाधिकारी

महाराष्ट्र राज्य देशात दुसर्‍या क्रमांकाचे निर्यात राज्य असून एकूण निर्यात रु.5 लाख 45 हजार कोटी (17.33%) असून रायगड जिल्ह्यात एकूण निर्यात सुमारे रु.42 हजार कोटी (7.68%) इतका आहे. रायगड जिल्ह्यात प्रामुख्याने आयर्न अँड स्टील, केमिकल, अभियांत्रिकी, मांसवर्गीय उत्पादनांची निर्यात अधिक आहे. असेही जिल्हाधिकारी डॉ.कल्याणकर यांनी सांगितले.

या परिषदेच्या निमित्ताने आयात-निर्यात व्यवसाय क्षेत्रातील विविध मान्यवरांनी आपले अनुभव उपस्थित नवउद्योजकांसमोर मांडले. लघु उद्योग समूहातील तसेच प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतील लाभार्थ्यांनी त्यांच्या व्यवसायाबाबतचे स्टॉल प्रदर्शन भरविले होते. परिषद सुरु होण्यापूर्वी या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, बँक ऑफ इंडियाच्या क्षेत्रीय प्रबंधक श्रीमती शंपा बिश्‍वास, विदेश व्यापार महासंचालनालयाचे महासंचालक सुदर्शन येलाराम, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी.एस.हरळय्या, जिल्हा कृषी अधीक्षक उज्वला बाणखेले आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

प्रास्ताविक जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी.एस.हरळय्या यांनी केले. तर सूत्रसंचालन किरण करंदीकर यांनी केले. आभार प्रदर्शन जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक शाम चकोर यांनी केले.

Exit mobile version