भातशेतीसह नाचणी पीकही धोक्यात

नांदगाव परिसरात मुसळधारः कापणी केलेले पीक भिजल्याने नुकसान

। नांदगाव । वार्ताहर ।

पाऊस काही थांबण्याचे नाव घेत नसून नांदगाव परिसरात जोरदार हजेरी लावली. हळव्या भातशेतीला फटका बसल्यानंतर आता या पावसाने नाचणी पिकही धोक्यात आले आहे. परिसरात कापणी केलेले भात पिकाचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनले आहेत.

यावर्षी पावसाला एकमिरगी सुरूवात झाली होती. रोप लावणीला कुणाचीही पावसाने अडवणूक केली नाही, पाणी अडवून किंवा शिंपून लावणी करण्याची वेळ आली नाही. शेतकरी समाधानी होता. पण, पीक पदरात घेण्याची वेळ आली तेव्हा थांबण्याची गरज होती पण तो काही थांबण्याचे नाव घेत नसल्याने शेतकर्‍यांना नुकसानीस समोरे जावे लागत आहे.

हळव्या भातशेतीला फटका बसल्यानंतरही नाचणी पिकही धोक्यात आले आहे. परिसरात कापणी केलेले भात पिकाचेही नुकसान झाले आहे. कापलेले भात पीक मळ्यातील पाण्यातच आडवे पडून आहे. त्यामुळे काही ठिकाणी भाताला कोंब आल्याचेही चित्र आहे. शिवाय विजेच्या गडगडाटामुळे अनेक भागात विद्युत उपकरणे जळून नुकसान झाले आहे. पडझड झाल्याने घरे, गोठे, झाडे कोसळली तर काही ठिकाणी जिवीतास धोकाही निर्माण झाला. मागील महिनाभर नागरिक दुपारी तीन नंतर दरवाजा खिडक्या बंद करून स्वतःला विजेच्या धोक्याला घाबरून कोंडून घेत आहेत.

अनेक ठिकाणी तर एकवेळ पावसाने बुडवले तरी चालेल पण विजेचा कडकडाट व लोळ यापासून अधिक भीती वाटते, असे ऐकायला मिळत आहे. अनेक ठिकाणी विज अंगावर पडून जीवितहानीच्या घटनाही घडल्या आहेत. सध्या सकाळी ऊन, दुपारनंतर पाऊस आणि पहाटे धुके अशी स्थिती पहावयास मिळत आहे. त्यामुळे शेतीसह बागायतींचेही नुकसान होत आहे.

Exit mobile version