। मुंबई । प्रतिनिधी ।
बीड मधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिने झाले. दोन महिने उलटूनही या प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार आहे. तसेच, या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा हात असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा अद्याप राज्यातील महायुती सरकारने घेतलेला नाही. त्यावरून शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारला फटकारले आहे. अंबादास दानवे यांनी समाजमाध्यमावर पोस्ट करत राज्य सरकार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही सवाल केले आहेत.
यावेळी अंबादास दानवे यांनी, कृष्णा आंधळे हा आरोपी अजून धरला गेलेला नाही. त्याच्या मुसक्या कधी अवळणार? आरोपी न्यायालयीन कोठडीत असताना त्यांना परत सीआयडीने आपल्या कोठडीत घेऊन तपास चालवला होता. त्यात काय डेटा रिकव्हर झाला ते लोकांना कधी कळणार? विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांनी नियुक्ती करण्याची मागणी समोर आली होती. त्यांच्या या नियुक्तीचे चार ओळींचे पत्र काढायला सरकारला अजून किती महिने लागणार? धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे एकच नाण्याच्या दोन बाजू आहेत, हे उभ्या जगाला ज्ञात आहे. मग यांच्या संबंधांची तपासणी कधी होणार? दरदिवशी नवे घोटाळे समोर येत असताना धनंजय मुंडे यांचा राजीनामा कधी घेणार? की ती ताकद मुख्यमंत्र्यांच्या बाहुत नाही?असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.