। मुंबई । प्रतिनिधी ।
शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खा. संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अगदी मोजक्या शब्दात एकनाथ शिंदे यांना जोरदार टोला लगावला आहे. सतत ऑपरेशन केलं अशा बाता मारणार्या एकनाथ शिंदे यांना चांगलेच फटकारले आहे. अमित शहांकडून कधी तुम्हाला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात येईल, कधी तुमचे ऑपरेशन होईल व तुमचे काय कापले जाईल हे तुम्हालाही कळणार नाही, असा जोरदार टोला संजय राऊत यांनी शिंदेंना लगावला आहे. तसेच, त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा देखील समाचार घेतला आहे.
संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रातील सरकार ही वेड्यांची जत्रा आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात की केजरीवाल खुर्चीसाठी लढत होते. मग ते कशासाठी लढत होते? त्यांना विजयाचा हँगओव्हर झाला आहे, तो उतरत नाही अजून. निदान देवेंद्र फडणवीसांनी संयमाने बोलायला हवे होते. या राजकारणात जे आलेले आहेत ते सगळे खुर्चीसाठीच लढत असतात. मुख्यमंत्रीपदाची खुर्ची गेल्यानंतर तुमचा चेहरा कसा काळा ठिक्कर पडला होता ते आम्ही पाहिले आहे. आताही मुख्यमंत्रीपद मिळाले नाही त्यामुळे तुमचे उपमुख्यमंत्री कसे काळवंडलेल्या तोंडाने फिरत आहेत, ते ही आम्ही पाहत आहोत, असे संजय राऊत म्हणाले आहेत.