। मुंबई । प्रतिनिधी ।
शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचा प्रत्येक शिवसैनिक हिंदुत्वाचा रक्षणकर्ता आहे. शिवसैनिक हिंदुत्व जपणारा आहे. आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही. याउलट भाजपनेच हिंदुत्वाचा बाजार मांडल्याची जळजळीत टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. कर्जत येथील संवाद मेळाव्यात ते बोलत होते.
कर्जत येथील शिवालय कार्यालयात शिवसैनिकांसाठी संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, पराभवाने खचून न जाता पुन्हा कामाला लागा. शिवसैनिक हा संघर्षातून पुढे आलेला आहे. त्यामुळे जय पराजयापेक्षा लोकहिताची कामे आम्ही करतच राहू. आपल्याला भाजपसारखी बोगस मतदार नोंदणी करायची नाही. भाजप खोटारडी पार्टी आहे. आमचे हिंदुत्व प्रामाणिक आहे. गद्दार लोकांना फक्त आर्थिक गोष्टीत रस असतो असे म्हणत त्यांनी शिंदेंवरही निशाणा साधला आहे. तसेच, एसटी तिकीट दरवाढ मागे घेण्यासाठी सरकारला भाग पाडू आणि सामान्य जनतेला न्याय देऊ, असा विश्वासही दानवे यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, शिंदे गटाचे कर्जतचे आ. महेंद्र थोरवे यांच्यावर अंबादास दानवे यांनी निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, गद्दार निवडून आले, परंतु गावात सुतक पडल्यासारखे वातावरण आहे. त्यांना साधी मिरवणूक काढता आलेली नाही की कोणी त्यांची ओवाळणी केली नाही, असे म्हणत थोरवे यांचा दानवे यांनी समाचार घेतला आहे.