। ठाणे । प्रतिनिधी ।
वारंवार नोटिसा बजावूनदेखील ठाणे जिल्ह्यात बेकायदा शाळांचा सपाटा सुरूच आहे. एकट्या ठाणे शहरात तब्बल 81 अनधिकृत शाळा असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येताच सरकार खडबडून जागे झाले आहे. जिल्ह्यातील सर्व बेकायदा शाळांना परीक्षेनंतर कायमचे टाळे ठोका, असे आदेश पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकार्यांना नियोजन समितीच्या बैठकीत दिले आहेत. त्यामुळे संस्थाचालक व अधिकार्यांचे धाबे दणाणले आहेत.
याबाबत प्रसारमाध्यमांनी आवाज उठवल्यानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी वार्षिक परीक्षा झाल्यानंतर जिल्ह्यातील सर्व अनधिकृत शाळा कायमच्या बंद कराव्यात, असे आदेश दिले. तसेच, या शाळा चालवणार्या संचालकांवर अजामीनपात्र गुन्हे दाखल करून त्यांच्यावर थेट कारवाई करण्यासही सांगितले आहे. नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील बेकायदा शाळांच्या प्रश्नावर चर्चा होत असतानाच शिक्षण विभागाच्या अधिकार्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला, मात्र विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन बेकायदा शाळा बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
15 दिवसांत कारवाई करणार
बेकायदा शाळा चालवणार्या संस्थाचालकांवर जोपर्यंत कठोर कारवाई होणार नाही तोपर्यंत हे प्रकार सुरूच राहणार असल्याचे आ. संजय केळकर यांनी सांगितले आहे. तर, यातील काही शाळांना परवानगी देण्यास शासनाकडूनच टाळाटाळ होत असून शिक्षण विभागाने नियमात असलेल्या शाळांना तत्काळ परवानगी देण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच, पुढील पंधरा दिवसांत अनधिकृत शाळांना कायमचे सील ठोकणार असल्याची माहिती ठाणे पालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी बैठकीत दिली आहे.