खड्ड्यांचा फटका रुग्णवाहिकेला

| माणगाव | वार्ताहर |
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम चालू आहे. महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. याच खड्ड्यांमुळे रुग्णवाहिकेचा तोल जाऊन ती नदीच्या पुलाच्या कठड्यावर जाऊन आदळली. ही घटना माणगाव शहरातील काळ नदीच्या पुलावर घडली आहे.

दि. 18 ऑक्टोबर रोजी दु. 12 वाजताच्या सुमारास निजामपूर येथील रुग्ण घेऊन सुनील तटकरे युवा प्रतिष्ठानची रुग्णवाहिका राऊत हॉस्पिटलमध्ये जात असताना माणगाव शहरातील काळ नदीच्या पुलावर आली असता खड्ड्यांमुळे तोल जाऊन कठड्यावर आदळली. यावेळी रुग्णवाहिकेमध्ये एक रुग्ण व त्याचे नातेवाईक होते. कठडा असल्याने सुदैवाने रुग्णवाहिका नदी पात्रात पडली नाही. या अपघातात रुग्णवाहिकेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

माणगाव शहरात चेतक कंपनी महामार्गाचे काम करीत आहे. शहरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. काम करणारी कंपनी तात्पुरत्या स्वरूपात नेहमी खड्डे भरण्याचे काम करते. परंतु, जर असे अपघात होऊन जीवितहानी झाल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्‍न माणगावकर विचारत आहेत.

Exit mobile version