माथेरानमधील रुग्णवाहिका भंगारात

स्थानिक रुग्णांचे प्रचंड हाल; खासगी रुग्णवाहिकेचा गैरवापर

| नेरळ | वार्ताहर |

माथेरानमध्ये वाहनांना बंदी असून, केवळ रुग्णवाहिकांना वाहतुकीची परवानगी आहे. त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांसाठी शासनाने रुग्णवाहिका उपलब्ध केल्या असून, शासनाच्या दोन्ही रुग्णवाहिका नादुरुस्त झाल्याने स्थानिक रुग्णांचे हाल होत आहेत. दरम्यान, बंगलेधारक यांच्याकडून पालिकेला देण्यासाठी आणलेली रुग्णवाहिका पालिकेने ताब्यात घ्यावी जेणेकरून त्या रुग्णवाहिकेचा सुरु असलेला गैरवापर कमी होईल. त्याचवेळी पालिका स्थानिक प्रश्‍न सोडविण्यासाठी एवढा मोठा खर्च करीत असताना जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेली रुग्णवाहिका दुरुस्त करण्यासाठी का तत्परता दाखवत नाही, असा प्रश्‍नदेखील समोर येत आहे.

माथेरानमध्ये इको सेन्सेटिव्ह झोन जाहीर होण्याआधी केवळ एक रुग्णवाहिका चालविली जात आणि इको झोननंतर शहरात दोन रुग्णवाहिकांना परवानगी देण्यात आली आहे. शासनाकडून आलेल्या रुग्णवाहिकांची संपूर्ण देखभाल करण्याची जबाबदारी पालिकेकडे आहे. मात्र, माथेरान मधील असलेल्या दोन्ही रुग्णवाहिका बंद आहेत आणि त्यामुळे रुग्णांचे हाल होत असून, पालिका त्या दोन्ही रुग्णवाहिका यांची दुरुस्ती का करीत नाही असा प्रश्‍न आता समोर आला आहे.

माथेरानसाठी मावळ लोकसभा मतदारसंघाचे तत्कालीन खासदार गजानन बाबर आणि विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून प्रत्येकी एक रुग्णवाहिका देण्यात आली आहे. त्याचवेळी शासनाच्या 108 सेवेतील रुग्णवाहिका माथेरान शहराच्या सेवेत आहे. त्यापैकी गजानन बाबर यांच्या निधीमधून देण्यात आलेली रुग्णवाहिका भंगारात काढण्यात आली आहे. तर, विद्यमान खासदार बारणे यांच्या निधी आलेली रुग्णवाहिकीची चाके गाळात रुतली आहेत. त्यामुळे स्थानिकांना आपल्या कुटुंबातील आजारी सदस्याला रुग्णालयात नेण्यासाठी कोणतीही व्यवस्था पालिकेने केलेली नाही. तर खासगी गाड्यांमधून रुग्णाला सेवा देण्याची वेळ माथेरानमधील स्थानिकांवर असून, पालिकेच्या ताब्यातील रुग्णवाहिका कशासाठी आहेत, असा प्रश्‍न सामान्य माथेरानकरांना पडला आहे. त्यात माथेरानमध्ये बंगलेधारक यांच्याकडे एक लहान रुग्णवाहिका आहे. ती रुग्णवाहिका पालिकेने ताब्यात घेतलेली नाही आणि दुसरीकडे त्या रुग्णवाहिकेचा सर्रास वापर चुकीच्या पध्यतीने होत असताना स्थानिक पाहत आहे.

दरम्यान, पालिकेने आपल्या रुग्णवाहिका यांना जिपीआरएस सेवा कार्यान्वित करावी, अशी सूचना जेष्ठ नागरिक जनार्दन पारटे यांनी केली आहे. त्यामुळे गाडी कोणत्या ठिकाणी आहे याची माहिती मिळेल, पण त्यासाठी रजिस्ट्रर नोंदणी आवश्यक करावी, अशी सूचना देखील पारटे यांनी केली आहे. पालिकेने अन्य कामांकडे लक्ष देताना थोडे गावातील नागरिकांच्या गरजेची असलेल्या रुग्णवाहिकेच्या देखभालीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी जेष्ठ नागरिक चंदने यांनी केली आहे.

पालिकेने शहरातील ज्येष्ठ नागरिक तसेच दुर्धर आजार असलेले रुग्ण आणि वेगवेगळे आजार यांची बाधा झालेले रुग्ण यांची यादी तयार करावी. ती यादी पालिकेने पाहून आणि रुग्णाची खात्री करून रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी.

उमेश मोरे, स्थानिक नागरिक
Exit mobile version