डम्पर मालकाचा आरोप; अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
पेणकडून अलिबागकडे जाणारा मालवाहू डम्पर रस्त्यावर रविवारी (दि.23) सकाळी पलटी झाला होता. या डम्परला सोमवारी पहाटे अचानक आग लागली. या आगीत डम्परचे प्रचंड नुकसान झाले आहे. ही आग लागली नसून पेट्रोलच्या मदतीने आग लावून डम्परचे नुकसान करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप डम्पर मालक अनंत गोंधळी यांनी केला आहे. याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पेण येथून खडी घेऊन (एमएच-06-बीडब्लू-7992) या क्रमांकाचा डम्पर घेऊन चालक अलिबागकडे जात होता. दरम्यान सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास कार्लेखिंड जवळ चढणीवर आल्यावेळी चालकाचा डम्परवरील ताबा सुटला. त्यामध्ये डम्पर पलटी झाला. रात्री बॅटर्या चोरी होऊ नयेत, म्हणून गोंधळी यांच्या मुलांनी ट्रकच्या बॅटर्या काढून घरी नेल्या होत्या. हा डम्पर कार्लेखिंड परिसरात असताना, सोमवारी (दि.24) पहाटे एक वाजण्याच्या सुमारास अचानक डम्परला आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अलिबाग पोलीसांसह आरसीएफ येथील अग्नीशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.
डम्परचे मालक अनंत गोंधळी या घटनेबाबत नाराजी व्यक्त करीत कोणीतरी नुकसान करण्याच्या उद्देशाने हा प्रकार घडवून आणल्याचा आरोप करण्यात आला आहे. सोमवारी दुपारी रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची भेट घेऊन आग लावणार्याविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. ही आग पेट्रोलच्या मदतीने लावण्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार रुपेश निगडे अधिक करीत आहेत.