। चिपळूण । प्रतिनिधी ।
चिपळूण तालुक्यातील पशुपालक, शेतकरी बांधव, सुशिक्षित बेरोजगार तरुण, तरुणी व महिलांनी पशुसंवर्धन विभागाच्या नावीन्यपूर्ण योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्जाचे आवाहन करण्यात आले आहे. नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत दोन दुधाळ गायी/म्हशींचे गट वाटप करणे, 10 शेळ्या/मेंढ्या व 1 नर बोकड गट वाटप करणे, 1000 मांसल कुक्कुट पक्ष्यांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसाहाय्य देणे, 100 कुक्कुट पिलांचे वाटप या योजनांसाठी अर्ज मागवले जात आहेत.
पशुसंवर्धन संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने 1 जूनपर्यंत अर्ज करावेत. ऑनलाइन अर्जाची एक प्रत व अपलोड केलेली कागदपत्रे प्रिंट काढून पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती, चिपळूणकडे जमा करावे, असे आवाहन गटविकास अधिकारी उमा घारगे-पाटील, सहायक गटविकास अधिकारी प्रमोद केळस्कर, पशुधन विकास अधिकारी डॉ. विजय पांचाळ, पशुधन पर्यवेक्षक व्ही. एस. बारापात्रे यांनी केली आहे.