नवरीचे मांडवान संहितेचा शुभारंभ

| चिरनेर | वार्ताहर |

श्री दत्त माऊली प्रोडक्शनच्या निर्मितीतून साकारण्यात आलेल्या ‘नवरीचे मांडवान’ या मंगलाष्टका आणि लग्नगीतांवर आधारित असलेल्या लोककलाकृतीच्या संहितेचा शुभारंभ आवरे उरण येथील शिव मंदिरात शुकवार (दि.11) गायक महेश गावंड, संयोजक किशोर म्हात्रे, संकल्पना ज्ञानेश्‍वर घरत, ज्ञानदीप म्हात्रे व पूजा म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत निर्माते दत्ता भोईर यांच्या हस्ते करण्यात आला.

आगरी, कोळी, कराडी, आदिवासी समाजातील पूर्वापार परंपरागत विविध लोककला आज लुप्त होऊ लागल्या आहेत. मात्र, या कलेत समाजाचे भावनिक संबंध जोडलेले आहेत. यातून लोकांचे मनोरंजन करीत असतानाच त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचे कामही या रूपकात्मक कलेतून केलेले असते. परंपरेप्रमाणे शुभकार्यात मंगलाष्टके व पारंपरिक लग्न गीते आजही गायली जातात. यात एक उत्स्फूर्त असा काव्यप्रकार असतो. त्यात थोडाफार विनोदही असतो. असे सारे लोककलेचे प्रकार इथल्या लोकजीवनाशी समरसून गेलेले आहेत. या लोककला नव्या पिढीला प्रेरणादायी ठराव्यात, यासाठी नवरीचे मांडवान या देखण्या लोक कलाकृतीची निर्मिती केली असल्याचे निर्माते दत्ता भोईर यांनी यावेळी सांगितले.

याशिवाय आपल्या लोककला, नृत्यपरंपरा, आगरी कोळ्यांची मराठी लोकगीते व कोळीगीते तसेच महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल मराठमोळी लोककला म्हणून सर्वश्रुत असणार्‍या लावणीचेही दर्शन या लोककलाकृतीतून रसिकांना घडविले जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संगीत संयोजक रुपेश म्हात्रे, आयुष म्हात्रे, गायक सूरज पाटील, गणेश गावंड, नृत्य कलाकार साक्षी गावंड, सानिया म्हात्रे, अशितोष म्हात्रे, संचित गावंड आदींनी परिश्रम घेतले.

Exit mobile version